Jitendra Awhad : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्यातील वादाचे आज विधान भवनात तीव्र पडसाद उमटले. आज संध्याकाळी विधानभवनाच्या लॉबीमध्ये या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामुळे विधानभवन परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. दरम्यान, यावर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. विधिमंडळातच आमदार सुरक्षित नसतील तर आमदार कशाला राहायचं? असा संतप्त सवाल त्यांनी केलाय.
उत्तम जानकरांची आमदारकी धोक्यात, जात प्रमाणपत्र प्रकरणात नोटीस; जाणून घ्या प्रकरण
तसेच मी सभागृहात भाषण केल्यानंतर मोकळी हवा खाण्यासाठी बाहेर आलो असता माझ्यावर हल्ला करण्यात आला, ते गुंड मलाच मारण्यासाठी आले होते, असा दावा आव्हाडांनी केला.
हल्ल्यानंतर माध्यांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, मी विधानसभेत भाषण करून थोडी मोकळी हवा घेण्यासाठी सभागृहाबाहेर आलो होतो. तेव्हा हा प्रकार घडला. हे लोक मलाच मारण्यासाठी आले होते. हा हल्ला पडळकरांच्या लोकांनी केला आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले आहे. याहून मोठा पुरावा काय पाहिजे? तुम्ही विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते आमच्यावर हल्ले करणार असतील, तर आमदार सुरक्षित नाहीय, असा त्याचा अर्थ होतो, असं आव्हाड म्हणाले.
मी स्वतः सुरक्षित नसल्याचं अगोदरच ट्विट केले आहे. मला आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली आहे. कुत्रा, डुक्कर म्हटलं आहे. मारून टाकण्याची धमकीही देण्यात आली, असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला.
तर कशाला राहायचे आमदार?
पुढं ते म्हणाले, विधानसभेच्या पायऱ्यांवर आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचे आमदार? आमचा गुन्हा काय? कोणीतरी मवाल्यासारखा येतो, आमच्या आई-बहिणींवर शिव्या देतो, त्याला आता ऑफिशिअस लॅंग्वेज म्हणून घोषित करा… असंसदीय शब्द वापरले जातात. त्यालाचा आता संसदीय शब्द म्हणून घोषित करा. सत्तेचा एवढा माज चढला आहे, असा तीव्र संताप आव्हाड यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. या गुंडांना कुणी प्रवेशिका दिल्या? त्यांची नावे उघड केली पाहिजेत. तसेच, विधानसभा अध्यक्षांनी हल्ला करणाऱ्या गुंडांवर आणि त्यांच्या पोशिद्यांवर कारवाई करावी, असं ठाकरे म्हणाले.