महाराष्ट्रात आजपर्यंत अनेक राजघराण्यांनी राजकारणात प्रवेश केला. समाजकारणाला राजकारणाची जोड दिली. यातील काहींना जनतेने स्वीकारले तर काहींना नाकारले. मात्र निवडणुकांमधील या जय-पराजयामुळे सार्वजनिक जीवनात त्यांच्याबद्दलचा आदर किंवा सन्मान तीळमात्र कमी झाला नाही. या राजघराण्याबद्दल आणि त्यांच्या वारसांबद्दल एक सार्वत्रिक कुतूहल आणि आदर आजही अनेक घटनांमधून दिसून येतो. यात आवर्जून उल्लेख करावा लागतो तो सातारा आणि कोल्हापूरच्या राजघराण्यांचा.
साताऱ्याचे राजघराणे पहिल्यापासूनच राजकारणात कायम राहिले. प्रतापसिंहराजे भोसले, अभयसिंहराजे भोसले या दोघांनीही 70 च्या दशकापासूनच राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर प्रतापसिंहराजे भोसले यांचे वारसा त्यांचे पुत्र उदयनराजे भोसले यांनी पुढे चालविला तर अभयसिंहराजे भोसले यांचा वारसा त्यांचे पुत्र शिवेंद्रराजे भोसले यांनी कायम ठेवला. परिणामी गेल्या 50 ते 60 वर्षांपासून साताऱ्याचे राजकारण हे राजघराणे वगळून करताच येत नाही. उदयनराजे भोसले यांनी आधी आमदार म्हणून काम केले तर आता चौथ्यांदा खासदार म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. तर शिवेंद्रराजे भोसले हेही चौथ्यांदा आमदार म्हणून काम करत आहेत.
दुसऱ्या बाजूला कोल्हापूरचे राजघराणे मात्र अगदी अलिकडील काळात राजकारणात आले. शिवाय कोल्हापूरच्या राजकारणात या राजघराण्याचा फारसा प्रभावही दिसून येत नाही. याचे कारणही सोपे आहे. कोल्हापूरमधील काही पत्रकारांच्या मते इथल्या राजघराण्याला राजकीय संधी आल्या नाहीत असं नाही. अनेकदा संधी आल्या, मात्र दार ठोठावून, दारावरुनच माघारी फिरल्या. याची अनेक उदाहरणे सांगता येतील. याचे कारण म्हणजे आजपर्यंत इथल्या राजघराण्याला समाजकारण की राजकारण यापैकी नेमकी कशाची निवड करायची हे ठरविता आलेले नाही.
परिणामी आताही कोल्हापूरच्या श्रीमंत शाहू महाराज यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा सुरु आहे. मात्र ते निवडणूक लढवतील का? किंवा लढविली तरी ते निवडून येतील का? हे ठामपणे कोणीही सांगू शकत नाही. यापूर्वी या राजघराण्यांनी दोन पराभव पाहिले आणि पचवलेही आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेत राजघराण्याबद्दल आदराचे आणि सन्मानाचे स्थान असले तरी राजकीय दृष्ट्या मात्र राजघराण्यापेक्षा प्रस्थापित नेतेमंडळींचा प्रभाव जास्त दिसून येतो. यात महाडिक, पाटील, मुश्रीफ, मंडलिक, घाटगे अनेक गट कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय आहेत.
कोल्हापूरच्या राजघराण्याचा राजकीय प्रवेश झाला 1967 साली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेसमधून माजी उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात यांना तिकीट दिलं. काँग्रेसच्या विरोधात तगडा असा उमेदवारच नसल्याने सुरुवातीला थोरात यांचा विजय सोपा वाटत होता. मात्र अखेरच्या क्षणी शेतकरी कामगार पक्षाने आणि काँग्रेस पक्षातील यशवंतराव चव्हाण यांना विरोध असणारे नेते एकत्र आले. या सर्वांनी छत्रपती शाहू महाराजांच्या स्नुषा आणि राजाराम महाराजांच्या पत्नी विजयमालाराजे यांना निवडणूक लढविण्यासाठी तयार केले आणि शेकापचे तिकीटही दिले.
विजयमालाराजे यांना आदराचे स्थान होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली अन् त्या जनरल थोरात यांचा पराभव करत निवडूनही आल्या. या निवडणुकीनंतर मात्र राजघराणे राजकारणापासून काहीसे लांब गेले. छत्रपती शहाजी महाराज राजकारणाऐवजी समाजकारण आणि इतिहास संशोधनाच्या कार्याकडे वळले. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाचे अनेक ग्रंथ प्रकाशित केले. या काळात शहाजी महाराज यांना मोरारजी देसाई यांनी राज्यपालपद स्वीकारण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती ऑफर नम्रपणे नाकारुन राजकारणापासून अलिप्तच राहणे पसंत केले.
त्यानंतर शहाजी महाराजांचे सुपुत्र आणि विद्यमान छत्रपती शाहू महाराज हे समाजकारणात आणि राजकारणात मोठ्या प्रमाणात सक्रिय राहिले. पण त्यांनी आजवर निवडणूक मात्र लढवली नाही. शाहू महाराज यांनी 1990 च्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय राजकारणात प्रवेश केला. करवीर मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवार एस. आर. पाटील यांचा जाहीर प्रचार केला होता. मात्र त्यानंतरही काँग्रेसचे त्यावेळचे उमेदवार दिग्विजय खानविलकर निवडून आले. पुढे राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर 1996 च्या सुमारास शाहू महाराजांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा हा पक्षप्रवेश अनेकांच्या भुवया उंचाविणारा होता. पण ते शिवसेनेत 2 ते 3 वर्षच सक्रिय राहिले.
पुढे शाहू महाराज यांचे धाकटे पुत्र मालोजीराजे राजकारणात आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कोल्हापूर शहरातील राजकारण, समाजकारणात सहभागी होऊन काम सुरू केले. अनेक छोट्या-मोठ्या उपक्रमांच्या माध्यमातून ते शहरातील घराघरात पोहोचले. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत मालोजीराजे यांच्या उमेदवारीवर चर्चा होऊ लागल्या. मात्र घोळ असा झाला की, त्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. पण दोन्ही काँग्रेसच्या वाटपामध्ये कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे होती आणि मालोजीराजे राष्ट्रवादीमध्ये होते.
मात्र शरद पवार यांनी दावा न करता ही जागा काँग्रेससाठी सोडली, परंतु उमेदवार मालोजीराजे असतील या अटीवर. मालोजीराजे काँग्रेसमधून जवळपास 28 हजारांच्या फरकाने निवडून आले. मालोजीराज यांच्यामुळे 1980 नंतर पहिल्यांदाच ही जागा जिंकता आली. मालोजीराजे यांच्यासोबत त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे छत्रपती हेही राजकीयदृष्ट्या सक्रिय झाले होते. वडील शाहू महाराजांच्यापेक्षा दोन पावले पुढे टाकून त्यांनी सार्वजनिक जीवनातील व्यवहार वाढवला. 2009 मध्ये राजकीय समीकरण बदलली आणि लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले.
मात्र ऐनवेळी मिळालेली उमेदवारी आणि सदाशिवराव मंडलिक यांची बंडखोरी यामुळे संभाजीराजे यांचा पराभव झाला. पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीतही मतदारसंघ पुनरर्चना झाली आणि कोल्हापूर शहाराचे उत्तर आणि दक्षिण असे दोन मतदारसंघ झाले. बदललेल्या समिकरणानुसार मालोजीराजे यांनी कोल्हापूर उत्तरचा पर्याय निवडला. मात्र राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा पराभव केला. या निवडणुकीत मालोजीराजे 5 वर्षामध्ये नॉट रिचेबल राहिल्याचा मुद्द्यावर जोर देण्यात आला होता. त्यातुलनेत क्षीरसागर शिवसेनेचे शिवसैनिक, जनतेत थेट उतरुन रस्त्यावरची लढाई लढण्याची क्षमता, आक्रमक स्वभाव या गोष्टी जमेच्या बाजू ठरल्या.
लागोपाठ दोन निवडणुकांमधील पराभव पाहिला आणि पचविल्यानंतर राजघराण्याने राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले. त्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमधून महाराष्ट्रभर आपले कार्यक्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी समाजकारण आणि जोडीला मराठा आरक्षण आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरु केले. पुढे 2016 मध्ये तत्कालिन मोदी सरकारने संभाजीराजे छत्रपती यांची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त कोट्यासाठी शिफारस केली आणि ते पहिल्यांदा खासदार झाले. 6 वर्ष खासदार म्हणून काम केल्यानंतर 2022 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातून राज्यसभेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली. मात्र थोड्याच दिवसात त्यांनी माघार घेतली.
आता संभाजीराजे हे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून आपला राजकीय परिघ विस्तारण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे शाहू महाराज आणि शरद पवार यांच्यात नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहेत. पुतणे अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार हे अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या कोल्हापूरमध्ये होणाऱ्या सभेच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज हे असतील. थेट पवारांच्या राजकीय व्यासपीठावर शाहू महाराज जाणार असल्याने साहजिकच ते कोल्हापूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यांनी त्यास नकार दिला पण हा नकार देतानाच आपण याआधी इच्छुक होतो तेव्हा मात्र कोणी साथ दिली नाही अशी मनातील खंतही अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली.
या राजघराण्याचा तिढा 2024 पर्यंत आणखी चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण मालोजीराजे पुन्हा आमदार होण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. तर संभाजीराजे हे नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याच्या चर्चा अधून मधून होतच असतात. या चर्चेत शाहू महाराजांचे नाव आता आले आहे. त्यामुळेच कोल्हापूरच्या या तीन महाराजांवर महाराष्ट्राचे लक्ष असेल एवढे मात्र नक्की!