Mla Rohit Pawar On Cm Devendra Fadanvis : लातूरच्या देवणी तालुक्याच्या बोंबळी गावात येथील शेतकऱ्याचा बैल वीज पडून मृत्यू झाल्याने शेतकऱ्याने आपल्या पत्नीलाच औताला जुंपल्याचं समोर आलं होतं. शेतकऱ्याला मदत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना बैल उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला गोशाळेतील बैल दिला परंतू तो आजारी निघाल्याने आता शेतकऱ्याला त्याच्या खिशातील पैशांमधून बैलाचा उपचार करावा लागत आहे. या संपूर्ण घडामोडींवरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत सरकारवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. सरकारच्या नियतीतच खोट असल्याचा टोला आमदार पवार यांनी लगावलायं.
विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून दिलेला बैल आजारी निघाला. आता त्याच्या उपचाराचाच खर्च संबंधित शेतकऱ्याला करावा लागतोय. शेतकरी कर्जमाफीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. द्यायची म्हणून दिलेल्या कर्जमाफीमध्ये अटीशर्तीच जास्त लादून ती… pic.twitter.com/2epZXtHVoO
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2026
आमदार रोहित पवार शेअर पोस्ट केलेल्या म्हणाले, विरोधक आणि माध्यमांच्या दबावामुळं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याला नुकसानभरपाई म्हणून दिलेला बैल आजारी निघाला. आता त्याच्या उपचाराचाच खर्च संबंधित शेतकऱ्याला करावा लागतोय. शेतकरी कर्जमाफीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नसल्याचं आमदार पवार म्हणाले आहेत.
तसेच शेतकऱ्यांना द्यायची म्हणून दिलेल्या कर्जमाफीमध्ये अटीशर्तीच जास्त लादून ती बहुतांश शेतकऱ्यांना मिळू नये याची अधिक काळजी घेतली. आता बैलावर उपचारासाठी स्वतःच्या खिशातील पैसे खर्चण्याची वेळ संबंधित शेतकऱ्यावर आली, त्याप्रमाणेच कर्जमाफीसाठीही सरकारने घातलेल्या अटींमुळं आधी स्वतःकडचे पैसे शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. यातून या सरकारच्या नियतीतच खोट आहे, हे दिसत असल्याचं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय. आमची सरकारला विनंती आहे की, अन्नदात्याला द्यायचं ते हातचं राखून देऊ नका, तर निर्मळ आणि मोकळ्या मनानेच द्या! शेवटी तिजोरी ही जनतेची आहे, असाही खोचक टोला आमदार पवार यांनी सत्ताधारी सरकारला लगावलायं.
दरम्यान, गरीब कुटुंबातील शेतकरी दाम्पत्याची बैल विकत घेण्याची अर्थिक परिस्थिती नसल्याने शेतकऱ्याने आपल्या पत्नीलाच औताला जुंपले होते. या घटनेची दखल मुख्यमंत्री फडणवीसांनी घेत बैल देण्याची मदत केली होती. आता हा बैल आजारी निघाल्याने शेतकऱ्याच्या खिशावर आणखीनच ताण आल्याची परिस्थिती आहे. विरोधक म्हणून आमदार पवार यांच्या टीकेनंतर सरकार शेतकऱ्याचा अर्थिक भार कमी करणार? हा सवाल उपस्थित होत आहे.
