Download App

कोल्हापूर : परतीचा संदेश घेऊन पवारांचा दूत माजी मंत्र्यांच्या घरी; बंद दाराआड दीड तास खलबत

कोल्हापूर : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने स्थानिक गणिते लक्षात घेऊन सर्व पक्षीय नेत्यांमध्ये पक्ष बदलाचे वारे सुरु वाहू लागले आहेत. स्थानिक गणिते आणि भविष्यातील राजकारण याची समीकरणे साधून निर्णय घेण्यावर भर दिला जात आहे. यात आता माजी मंत्री आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर (Rajendra Patil Yedravkar) यांचे नाव जोडले जाण्याची शक्यता आहे. (Leader of Nationalist Party (Sharad Pawar) Rajesh Tope met Rajendra Patil Yedravkar at his residence in Shirol.)

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे नेते राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांची शिरोळ (Shirol) येथील निवासस्थानी भेट घेतली. मात्र यावेळी दोघांमध्येही बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा परतीचे संदेश घेऊन ही भेट झाल्याचे सध्या सांगितले जात आहे. परंतु दोघांनीही या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हणत या सर्व दावे फेटाळून लावले.

मुंबईमुळे ‘मविआ’त फाटणार? ठाकरेंकडील दोन विजयी जागांसह चार मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा

राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाते. त्यांची राजकारणाची सुरुवातच राष्ट्रवादीमधूनच झाली. 2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून शिरोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती. त्यावेळी त्यांना 20 हजार मतांच्या फरकाने शिवसेनेच्या उल्ल्हास पाटील यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 मध्येही ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुटल्याने त्यांनी बंडखोरी केली. यावेळी मात्र त्यांना यश आले.

पण आमदार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा महाविकास आघाडीची वाट धरली. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे सहयोगी आमदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या सरकारमध्ये त्यांची मंत्रीपदावरही वर्णी लागली. त्यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचवेळी त्यांचे आणि आरोग्यमंत्री असलेल्या राजेश टोपे यांचे निकटचे संबंध आले होते. पण नंतर मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याच निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मतदारसंघातील विकासकामांसाठी शिंदेंसोबत गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

देवरांच्या राजीनाम्याचा काँग्रेस नेत्यांना ‘धक्का’ अन् राहुल गांधींच्या यात्रेचाच दिवस निवडल्याने ‘खंत’!

आता पुन्हा एकदा राजेश टोपे यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते पुन्हा शरद पवारांच्या गटात परतणार का? या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेदरम्यान राजेश टोपे यांनी राजेंद्र पाटील यड्रावकर यांची वरिष्ठांसोबत फोनवरून बातचीत करून दिल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, यड्रावकर पुन्हा राष्ट्रवादीमध्ये आल्यास शरद पवार यांच्या गटाला कोल्हापूर जिल्ह्यात बडा नेता मिळू शकतो. याशिवाय हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणितेही बदलू शकतात.

follow us