Download App

हातकणंगलेत राजू शेट्टींची कोंडी; राष्ट्रवादीतून स्वतः जयंत पाटीलच उतरणार लोकसभेच्या मैदानात?

हातकणंगले : भाजपची साथ सोडून महाविकास आघाडीशी जवळीक साधलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांना आगामी लोकसभा निवडणूक सोपी जाणार नसल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीने हातकणंगलेतून उमेदवारांची चाचपणी केल्याने शेट्टींना महाविकास आघाडीचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट होतं आहे. त्यातही राष्ट्रवादीतून हातकणंगलेसाठी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे शेट्टी यांना लोकसभा गाठण्यासाठी भाजप, महाविकास आघाडी आणि जयंत पाटील यांच्यासारख्या बलाढ्य उमेदवाराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. (Lok Sabha election 2024 Raju Shetty vs Jayant Patil in Hatkanangle Lok Sabha constituency)

मुंबईत काल (३० मे) शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. यात राष्ट्रवादीने १० लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यामध्ये सातारा, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, अहमदनगर, शिरुर, मावळ अशा मतदारसंघांचा समावेश होता. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आर. के. पोवार, ए. वाय. पाटील उपस्थित होते.

हातकणंगलेतून जयंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास ते विजयी होऊ शकतात, असे जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी सुचविले. याला अन्य पदाधिकाऱ्यांनीही दुजोरा देत पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला. याचवेळी हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नातू आणि जिल्हा बँकेचे संचालक रणवीर गायकवाड यांचे नाव सुचविले. रणवीर गायकवाड यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे आजोबा 5 वेळा खासदार, 3 वेळा आमदार आणि मंत्रीही राहिले आहेत. वडिलांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे आणि आता प्रदेश उपाध्यक्ष आहेत. याशिवाय गायकवाड घराण्याचे जिल्हातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत, असे दावे पवारांपुढे करण्यात आल्याची माहिती आहे.

हातकणंगलेचा किल्ला सर करण्यासाठी राष्ट्रवादीची रणनीती :

हातकणंगले मतदारसंघ कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्हांमध्ये विभागला गेला आहे. यात कोल्हापूरातील शाहुवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ हे 4 विधानसभा मतदारसंघ आणि सांगलीतील इस्लामपूर, शिराळा या मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघांमधील महाविकास आघाडीची सध्याची स्थिती पाहिल्यास शाहूवाडी- पन्हाळ्यातून ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील, तसेच संयुक्त गायकवाड गट मोठे मताधिक्य देऊ शकतात. हातकणंगलेतून आमदार राजू बाबा आवळे, शिरोळमधून ठाकरे गटाचे उल्हास पाटील यांची ताकद मिळू शकते, असे दावे केले जात आहेत. याशिवाय इचलकरंजीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना (UBT) आणि काँग्रेसची मदत बऱ्यापैकी होऊ शकते. इस्लामपूरमधून स्वतः जयंत पाटील, शिराळ्यातून आमदार मानसिंगराव नाईक आणि माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांची मदत होऊ शकते असे आडाखे बांधले जात आहेत.

Tags

follow us