Lok Sabha Election Sangli 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत (MVA) अतिशय कळीचा ठरलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा मतदारसंघ ठाकरे गटाने अगदी काँग्रेसच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे खेचून घेतलाय. इतकंच नाही तर थेट पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसच्या जखमेवरची खपली काढून जखम भळभळती केली आहे. त्यातच दुसरा घाव संजय राऊतांना घातलाय. सांगलीची जागा शिवसेनाच लढणार असे अगदी पद्धतशीरपणे सांगून टाकले. अर्थात त्याला उद्धव ठाकरेंचीही साथ आहेच.
या राजकारणातील ठाकरे खेळीनंतर काँग्रेस नेते विश्वजित कदम दिल्लीत तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील यांनी एक पोस्ट लिहित मन मोकळं केलं आहे.
महाविकास आघाडीमधील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सध्या सांगली लोकसभाच्या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्ष या जागेवर दावा करत असल्याने सध्या संपूर्ण राज्यात सांगली लोकसभेची जागा चर्चेचा विषय बनली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून या जागेसाठी विशाल पाटील इच्छुक असल्याने ते दिल्लीत तळ ठोकून आहेत. यातच आता त्यांनी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिलं आहे.
या पत्रामध्ये त्यांनी सांगली काँग्रेसचा गड आहे. यामुळे सांगलीमध्ये मोठ्या ताकदीने लढू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे.
विशाल पाटलांच्या पत्रात काय?
मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळे सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झालं आहे.
स्व. वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर. आर. पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे तुम्हाला ठाऊक आहेच. त्यामुळे काँग्रेस आणि सांगलीचं अतूट नातं तयार झालं आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने ‘सांगली काँग्रेसची’च या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्यावतीने विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत आहेत.
या आधीच्या काळात तुम्ही सर्वजण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात, याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे की, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री आहे.
आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू.
दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी विशाल पाटलांना संसदेत पाठविण्याबाबतचं वक्तव्य केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसशी आम्ही सांगलीच्या बाबतीत अनेक पर्यायांची चर्चा केली आहे. सांगलीमधून लोकसभा निवडणूक शिवसेनाच लढवणार आहे.
पंजाबराव डख यांच्याकडे फक्त 10 हजार रोकड, जाणून घ्या एकूण संपत्ती
तर विशाल पाटलांना संसदेत पाठवण्यासाठी शिवसेना देखील पुढाकार घेणार असल्याचे संकेत त्यांनी माध्यमांशी बोलताना दिले होते. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे विशाल पाटलांना मविआच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठविण्याची चर्चा काँग्रेससोबत झाल्याचे तर्क सध्या राजकीय वर्तुळात लढविले जात आहेत.