Vikhe Vs Gadakh Case : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) आता नगरमधील राजकारण तापू लागले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून 2024 साठी भाजपचे खासदार सुजय विखेंविरोधात (Sujay Vikhe) नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख (Shankrao Gadakh) हे मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली. गडाख यांना लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी ठाकरे गट आग्रही आहे. या राजकीय चर्चा सुरू झाल्यानंतर डोळ्यासमोर येते ती 1991ची लोकसभा निवडणूक. खासदार सुजय विखेंचे आजोबा बाळासाहेब विखे (Balasheb Vikhe) व शंकरराव गडाख यांचे वडील यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh) यांच्यातही ही लढत झाली होती. त्याचवेळी मुख्यमंत्री शरद पवार (Sharad Pawar) व बाळासाहेब विखेंमध्ये तीव्र राजकीय संघर्ष घडला. निवडणूक थेट न्यायालयात गाजली. देशाला आदर्श आचारसंहिता मिळाली. या निवडणुकीत नेमकी काय झाले होते हे जाणून घेऊया.
Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सुनावणीचा दिवस ठरला
काँग्रेसचे बाळासाहेब विखे हे कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. परंतु 1991 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांचे तिकीट कापले. त्याला कारण होते विखे यांचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरुद्ध बंडाचे.त्यामुळे काँग्रेसने कोपरगावमधून शंकरराव काळे, तर अहमदनगर दक्षिणमधून यशवंतराव गडाखांना मैदानात उतरविले होते. विखे यांनी थेट आपल्या मोर्चा दक्षिणेकडे वळविला. नगरमधून ते अपक्ष रिंगणात उतरले. मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांच्यावर थेट बाळासाहेब विखे यांना पराभूत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
Chhagan Bhujbal : दिल्ली दौऱ्यात अजितदादा का नाही? भुजबळांनी दिलं नेमकं उत्तर
बाळासाहेब विखे यांचे चिन्ह सायकल होते. गडाख -विखे यांच्यामध्ये अतितटीची लढत झाली. या निवडणुकीत बाळासाहेब विखे हे अकरा हजार मतांनी पराभूत झाले. गडाखांना 2 लाख 79 हजार 520 मते मिळाली होती. तर विखे यांना 2 लाख 67 हजार 388 मते मिळाली होती. निवडणूक झाली विखे पराभूत झाले. पण संघर्ष येथेच संपला नाही. न्यायालयीन लढाई सुरू झाली. विखेंनी शरद पवार व गडाखांविरोधात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात खटला दाखल केला. गडाख व पवार या दोघांनी माझे चरित्र्यहनन केले. गडाख यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला आहे. त्यामुळे त्यांची लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 निवड रद्द करावी, मला विजयी घोषित करावे, अशी मागणी विखेंनी न्यायालयात केली होती.
त्यासाठी काही पुरावेच विखेंनी न्यायालयात दिले. त्यात पवार व गडाखांनी सभांमधील भाषणांची पुरावे होते. त्यात विखे यांचे निवडणुकीचे बजेट तीन कोटींचे आहे. विखे यांनी जनता दलाचे उमेदवार व माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांना वीस लाख रुपये दिले. त्यामुळे कोळसे यांनी नगरमधून माघार घेऊन बीडमधून उमेदवारी केली, असा आरोप गडाखांनी केला होता. तर विखे पाटलांनी पाच हजार सायकलींची वाटप केले. मतदारांना साडी-धोतर, दारूचे वाटप करतात. त्यांचे पैसे घ्या मत मात्र काँग्रेसला करा, असेही भाषणही गडाख यांनी श्रीगोंद्यातील सभेत केले होते. शरद पवार यांच्या उपस्थित ही सभा झाली. गडाख व पवारांनी माझे चारित्र्य हनन करून प्रतिमा डागाळल्याचा दावाच विखेंनी केला होता.
खंडपीठात दोन वर्ष सुनावणी झाली. न्यायालयाने लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार गडाखांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत त्यांची निवड रद्द ठरवली. विखेंनी विजयी घोषित केले. तर गडाखांना सहा वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घातली. तर पवार यांच्यावर कोर्टाने ताशेरे ओढले. पवारांना लोकप्रतिनिधी कायद्यानुसार नोटीस काढण्यात आली.
या निकालाविरोधात गडाखांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. तर शरद पवारांनी नोटीसाला आव्हान दिले. १९९३ मध्ये याचा निकाल लागला. त्यात गडाखांची निवड रद्द करण्याचा निर्णय कायम करण्यात आला. परंतु विखेंना विजयी करण्याचा निर्णय रद्द ठरविण्यात आला. तर शरद पवारांना बजावलेली नोटीस ही रद्द केली. या खटल्यानंतर निवडणूक आयोगाने आचारसंहिताही कडक केली होती. त्यामुळेच ही ही निवडणूक देशभर गाजली होती.
बाळासाहेब विखेंचे नातू सुजय विखेंविरोधात शरद पवारांनी मागील निवडणुकीतही यशवंतराव गडाखांचा मुलगा प्रशांत गडाखांना लोकसभेसाठी विचारणा केली होती. पण प्रशांत गडाखांनी नकार दिला होता. आता शंकरराव गडाखांचे नाव ठाकरे गटाकडून समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा विखे विरुद्ध गडाख संघर्ष सुरू होईल, अशी चर्चा सुरू झाली.
याबाबत नगरचे ज्येष्ठ पत्रकार भागा वरखडे म्हणाले, गडाखांचा जनसंपर्क दक्षिणेत आहे. घुले, राजळे हे राजकीय कुटुंब हे नातेवाइक आहेत. त्यांची मदत होऊ शकते. तसेच ठाकरे गटाची शिवसेनेची काही ताकद आहे. त्यामुळे अशी मागणी पुढे येत असावी. शिर्डी, नगर या लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षापैकी कुणाकडे जातात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे नगर लोकसभेची लढत कशी होईल हे भविष्यात समजणार आहे.