Download App

आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व हरपलं; पिचड यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातून हळहळ

महाराष्ट्राचंही कधीही न भरून येणारं नुकसान झालंय. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि लाखो आदिवासी बांधवांच्या दु:खात मी सहभागी आहे-एकनाथ शिंदे

  • Written By: Last Updated:

Madhukar Pichad Passed Away : भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड (Madhukar Pichad) यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. राज्याचे पहिले आदिवासी विकासमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती. आदिवासी समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या नेत्याची प्राणज्योत मालवली आहे. याबाबत राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मधुकर पिचड यांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी केलेल्या विकासकामांची आठवणींना उजाळाही दिला आहे.


विधीमंडळात विरोधी पक्षनेता असणार का? हंगामी अध्यक्ष कोळंबकर म्हणाले, ‘जर विरोधकांनी…’

समाजात वावरत असताना अगणित लोकांचे आयुष्य उजळले-फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद असल्याचे म्हटले आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरत असताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते.
आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.


आदिवासी कल्याणाचे एक प्रदीर्घ पर्व जणू संपले-उपमुख्यमंत्री शिंदे

आदिवासी कुटुंबातच जन्म घेतलेल्या मधुकरराव पिचड यांच्या साठीच्या दशकाच्या प्रारंभाला दूध संघाची निर्मिती करुन समाजकारणाचा वसा घेतला. त्यांचे सारे राजकारण आदिवासी बांधवांच्या कल्याणाभोवतीच राहिले. काही काळ ते ठाण्याचे पालकमंत्रीही होते. त्यांच्यातला आदिवासींचा सजग कैवारी मला जवळून पाहायला मिळाला. मधुकररावांचं जाणं हे माझं वैयक्तिक नुकसान आहेच, पण महाराष्ट्राचंही कधीही न भरून येणारं नुकसान झालंय. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि लाखो आदिवासी बांधवांच्या दु:खात मी सहभागी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रध्दांजली वाहिली.

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं-उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व हरपलं…विखेंकडून श्रद्धांजली

भाजपाचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व आणि जिरायती भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणामध्ये योगदान देणारे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना भाजप नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अगस्ती सहकारी साखर कारखाना, शिक्षण संस्था, तसेच या भागातील आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मधुकरराव पिचड यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केलेल्या कार्यामुळेच या भागामध्ये आज विकासाची प्रकीया सुरु झाली. अकोले तालुक्याच्या विकासात्मक वाटचालीत त्यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.


महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी त्यांनी आयुष्य पेरलं-शरद पवार

पिचड हे आजारावरती मात करतील असा आम्हाला विश्वास होता. राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांचं काम अतिशय उत्तम होतं. अनेक खाती त्यांनी संभाळली होती. आदिवासी भागात त्यांनी साखर कारखान्याची उभारणी केली. एका चांगल्या सहकाऱ्याला आज आम्ही मुकल्याच आम्हाला दुःख आहे, अशी श्रद्धांजली ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वाहिली आहे.

follow us