Download App

मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला रेडी पण, 7 मतदारसंघात धास्ती; तिकीट कुणाला मिळणार ?

  • Written By: Last Updated:

Maha Vikas Aghadi Seat Sharing : गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद होत होते मात्र आज महाविकास आघाडीकडून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. राज्यात 48 लोकसभा जागांपैकी शिवसेना (ठाकरे गट) 21 , शरद पवार यांची राष्ट्रवादी काँगेस 10 आणि काँग्रेस पक्ष 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या 21 उमेदवारांची घोषणा केली होती तर काँग्रेसकडून आतापर्यंत 13 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागांवर उमेदवार जाहीर केले होते. मात्र आता 7 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरलेले नाहीत. यामुळे या सात जागांवर कुणाला संधी मिळणार याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघ

जागावाटपामध्ये धुळे मतदारसंघ काँग्रेसकडे आला आहे. मात्र या मतदारसंघात काँग्रेसने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. या मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. डॉ. सुभाष भामरे यांच्या विरोधात काँग्रेस आता कुणाला मैदानात उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे. धुळे मतदारसंघामध्ये काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांना तिकीट देणार असल्याची चर्चा होती मात्र त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेस आता धुळ्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आणि नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या नावांचा विचार करत आहे.

जालना लोकसभा मतदारसंघ

जालना लोकसभा मतदारसंघात देखील काँग्रेसला अद्याप उमेदवाराची निवड करता आलेली नाही. जालना लोकसभा मतदारसंघात सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी होणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आहे. सध्या या मतदारसंघात काँग्रेसकडून कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा आहे.

मुंबई-उत्तर लोकसभा मतदारसंघ

भाजपकडून मुंबई-उत्तर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सध्या या मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. मुंबई-उत्तर लोकसभा मतदारसंघात 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा गोपाळ शेट्टींनी चार लाख मतांनी पराभव केला होता.

सातारा लोकसभा मतदारसंघ

सातारा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने शरद पवार यांच्याकडून उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस येत्या काही दिवसांत या मतदारसंतून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करू शकते.

रावेर लोकसभा मतदारसंघ

शरद पवार यांना मोठा धक्का देत एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असून फक्त घोषणाच बाकी आहे. त्यामुळे या मतरदारसंघातून शरद पवार कुणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रवींद्र पाटील आणि श्रीराम पाटील यांची नावं आघाडीवर आहेत. भाजपकडून या मतदारसंघात रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून नसीम खान, राज बब्बर आणि स्वरा भास्कर यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. मात्र या मतदारसंघात काँग्रेसकडून कुणाला तिकीट मिळणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. तर सत्ताधारी महायुतीकडून देखील अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या जागेवरून एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये तिढा आहे.

माढा लोकसभा मतदारसंघ

विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपकडून पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघातून संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. या मतदारसंघातून भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. भाजपकडून त्यांना तिकीट न मिळाल्याने ते लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मोहिते पाटील यांच्याशिवाय अनिकेत देशमुख आणि अभयसिंह जगताप यांची नावेही चर्चेत आहेत.

follow us