Mahadev Jankar on Mahayuti : 2014 मध्ये तुम्ही युती सोबत होतात तुम्हाला कॅबिनेट मंत्रिपद देखील मिळालं होतं. त्याकाळात तुम्हाला भाजप आणि शिवसेनेकडून कशी वागणूक मिळत होती? असा प्रश्न विचारला असता जानकर म्हणाले, ‘ज्यावेळेस आघाडी किंवा युती असते त्यावेळी एकमेकांची मजबुरी असते. पक्षांची काहीतरी कमतरता असते. ही कमतरता भरून काढण्यासाठी पॉलिटिकल अॅडजस्टमेंट केलेली असते. त्यावेळी आम्ही महायुतीबरोबर होतो. काँग्रेसला असं वाटायचं की आमच्यासारखे राज्य जगात कुठे नाही. हा त्यांचा नरेटीव्ह होता. त्यांचा हाच नरेटीव्ह पुसण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. काँग्रेसचे सरकार हटवून आम्ही सत्तेत आलो. ज्यावेळी सत्ता मिळाली तेव्हा आम्ही जनतेचचं काम केलं. त्यामुळे आजही महादेव जानकर भिकारीच आहे.’ राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर(Mahadev Jankar) यांनी लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत
‘देशात दुधाला सर्वाधिक दर देणारा डेअरी मिनिस्टर मी झालो. कायम दुर्लक्षित असलेलं पशुसंवर्धन खातं मला दिलं. तरी देखील हे खातं आघाडीवर आणण्याचं काम मी केलं. आज मला आनंद आहे. त्यातील एक खातं माझी बहिण चालवते. एक खातं नितेश राणे चालवत आहेत आणि एक खातं अतुल सावे चालवतात. मी ज्यावेळी मंत्री होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस असतील, सुधीर मुनगंटीवार असतील यांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं.
‘माझी बहिण पंकजा मुंडे यांनीही मला सहकार्य केलं. त्यावेळी युतीत होतो म्हणून मला चांगली वागणूक दिली. पण आता कालच्या विधानसभेत मी युतीत नव्हतो. त्यामुळं आता मी त्यांच्यावर नाराज असण्याच काही कारण नाही. त्यांनी त्यांच्या हिमतीवर राज्य आणलं आहे ठीक आहे आता त्यांचं राज्य घालवून माझं रासपाचं राज्य कसं येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे’, असा इशारा महादेव जानकर यांनी महायुतीला दिला.
लोकसभा निवडणुकीत तुम्ही महायुतीत होतात त्यावेळी तुम्हाला त्यांनी कशी वागणूक दिली. शरद पवार, काँग्रेस यांच्याकडेही तुमचं जाणं येणं होतं. एकंदरीतच सगळ्यांशी संवाद कसा होता या प्रश्नाचं उत्तर देताना जानकर म्हणाले, ‘भाजप युतीला विचारत नव्हता. आम्हाला एकही जागा द्यायला तयार नव्हता. आम्ही महायुतीकडे दोन आणि महाविकास आघाडीकडे तीन जागा मागत होतो. नंतर पवार साहेबांनी मला फोन केला. त्यानंतर पवार साहेबांशी आमची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार सोबत आल्याने भाजपला आमची गरज राहिली नव्हती. त्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही आम्हाला विचारलं सुद्धा नाही.’
‘पवार साहेबांनी सुद्धा आम्हाला नुसता गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला. पवार साहेब (Sharad Pawar) आमच्यासाठी जागा सोडणार नाहीत हे नंतर आमच्या लक्षात आलं. मोहिते पाटील यांना पक्षात घ्यायचं. महादेव जानकर यांना माढ्याची जागा सोडायची नाही असं नंतर माझ्या लक्षात आलं होतं. पुढे मला एकनाथ शिंदेंचा (Eknath Shinde) फोन आला. अजितदादांचाही फोन आला. नंतर अमित शाहंचा फोन आला त्यांच्याशी बोललो. नंतर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. त्यांनी मला परभणीची जागा सोडण्याची तयारी दाखवली. मला परभणीची जागा दिली. पण शरद पवार साहेब मला माढा देतो म्हणाले होते पण त्यांनी तसच भिजत घोंगडे ठेवलं.’
‘महायुतीने मला परभणीची जागा दिली. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी मेहनत घेतली. मला मदत देखील केली. पण दुर्दैवाने माझा पराभव झाला याचा दोष मी त्यांना देत नाही. नंतर मात्र ज्यावेळी महायुतीची बैठक चालली होती त्यावेळी आमच्या पक्षाला बोलावलं नाही. तरीदेखील मी दोन दिवस थांबलो होतो. नंतर पत्रकार परिषद घेत महायुतीमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.’