Download App

‘गणेश’ कारखाना ‘संगमनेर’ अन् ‘संजीवनी’च चालविणार; विखेंच्या तिरकस सवालाला थोरातांचे रोखठोक उत्तर

Ganesh Sugar Factory Election : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या (Ganesh Sugar Factory Election) निमित्ताने कट्टर राजकीय विरोधक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आमनेसामने आले आहेत. या दोन्ही नेत्यांतील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. आता कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेते पुन्हा मैदानात उतरले आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत काल मंत्री विखे पाटील यांनी थोरात यांच्यावर घणाघाती टीका केली होती. आज याच टीकेला आ. थोरात यांनीही तितक्याच तडफेने उत्तर दिले.

थोरात-कोल्हे गटाच्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार शुभारंभ सभेत थोरात यांनी विखेंवर निशाणा साधला. हा कार्यक्रम वाकडी येथील खंडोबा मंदिरात आज (शुक्रवार) पार पडला.

आमचा वाद संपलाय! राम शिंदेंसोबतच्या वादाला राधाकृष्ण विखेंनी दिला पूर्णविराम…

थोरात म्हणाले, मी याच तालुक्यातील मतदार आहे. तुम्ही जिल्हाभर हुंदडता अन् मला पाहुणे कलाकार म्हणता. तसे म्हणण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही. सभासदांनी आग्रह केला म्हणून आम्ही येथे आलो. गणेश कारखान्याची मागील आठ वर्षात काय अवस्था केली हे सर्वांनाच माहिती आहे. कोणत्याच गोष्टींचा हिशोब नाही. त्यामुळे आता हा कारखाना संजिवनी आणि संगमनेरच चालवणार असे उत्तर थोरात यांनी विखेंनी विचारलेल्या प्रश्नाला दिले.

काय म्हणाले होते विखे ?

निवडणुकीतील पॅनलच्या शुभारंभ कार्यक्रमात आयोजित सभेत मंत्री विखे पाटील यांनी आ. थोरात यांना घेरले. विखे म्हणाले, प्रवरा आणि गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कराराला अडीच वर्षे मंजुरी मिळू न देणे हा सत्तेचा गैरवापर नव्हता का? कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आलेल्या पाहुण्यांचा डोळा फक्त या भागातील उसावर आहे. गणेश कारखाना संजीवनी चालविणार की संगमनेर याचे उत्तर सभासदांना अजूनही मिळत नाही.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना हा करार होऊ दिला नाही. आज पॅनल करून जे समोर उभे आहेत त्यांच्यापैकी कुणीही गणेश कारखाना संजीवनी चालविणार की संगमनेर याचे उत्तर देत नाही. प्रवरेने हा कारखाना चालविण्याची जबाबदारी कालही घेतली होती उद्याही घेणार असल्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

राधाकृष्ण विखेंनी डिवचलं, संजय राऊतांनी स्वत:लाच धमकी दिली असेल…

निवडणुकीत का उतरलो, कोल्हेंनी सांगूनच टाकलं

संजीवनी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे म्हणाले, सभासदांनी गणेशच्या निवडणुकीत लक्ष घालण्याचा आग्रह धरला. सभासदांचा आग्रह मी डावलू शकलो नाही. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आम्ही ही आघाडी उघडली. आता सभासद आणि शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कोणत्याही प्रकारची राजकीय किंमत मोजण्याची आमची तयारी असल्याचे कोल्हे यांनी सांगितले.

Tags

follow us