Download App

वाकचौरेंना शिर्डीचं तिकीट फिक्स, नाराज घोलपांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र!

Babanrao Gholap resigns from Shivsena UBT : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. उपनेते राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिवसेनेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. घोलप हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून घोलप यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने त्यांच्याकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद काढून घेतले होते. यामुळे लोकसभा निवडणुकीआधीच घोलप यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. आता लवकरच घोलप शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेले दिसतील.

ठाकरे शिर्डीत तर घोलप शिंदेंच्या भेटीला

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांनी नगर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी शिर्डी लोकसभेच्या अनुषंगाने त्यांनी उत्तर मतदारसंघ पिंजून काढला. मात्र एकीकडे शिर्डीमध्ये ठाकरे लोकसभेची मोर्चेबांधणी करत असताना त्यांच्या गटाला घोलप यांनी सुरुंग लावला. उद्धव ठाकरे शिर्डीत असताना त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर घोलप हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.

Ahmednagar News : भुजबळांच्या मंचावर बोलणारे राजकीय करिअर संपलेले नेते, मराठा समाज आक्रमक

घोलप यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेटही घेतली होती. परंतु, त्यांचे समाधान झाले नाही. तसेच नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनाला देखील घोलप उपस्थित नव्हते. घोलप हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. यातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच घोलप यांनी ठाकरेंना धक्का देत शिंदेंच्या बाजूने उभे राहण्याची तयारी केल्याचे दिसत आहे.

पाच टर्मचे आमदार…एकनिष्ठ शिवसैनिक मात्र…

नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून घोलप हे पाचवेळा आमदार राहिले असून 1995 च्या युती सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपद देखील भूषवले आहे. तब्बल तीस वर्षे नाशिक जिल्ह्यात त्यांनी एकहाती वर्चस्व ठेवत शिवसेनेला बळकटी दिली होती. मध्यंतरीच्या काळात शिवसेनेमध्ये झालेल्या फुटीनंतर देखील त्यांनी शिंदेंना डावलत ठाकरेंच्या बाजूने उभे राहणे पसंत केले. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून आपल्या मुलीला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा घोलप यांची होती. मात्र, ऐनवेळी ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात प्रवेश दिल्याने घोलप नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला.

Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्र? भाजपाच्या सर्व्हेने विरोधकांना धडकी

follow us