Baramati Medical College Name : आज नगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर दुसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केलेली मागणीही मान्य करण्यात आली. इतकेच नाही तर तातडीने शासन निर्णयही जारी करण्यात आला.
आ. पडळकर यांनी बारामतीच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर लगोलग मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली. सरकार इतक्यावरच थांबले नाही तर ताबडतोब शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथील “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय” या संस्थेचे नाव बदलून ते “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती” असे करण्यात आले आहे. यासंदर्भाचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय… pic.twitter.com/2ChAmKh2ui
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 31, 2023
राज्य सरकारच्या वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने हा निर्णय जाहीर केला. यामध्ये म्हटले आहे, की जानेवारी 2013 मधील निर्णयानुसार बारामती येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व संलग्नित 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर संस्थेचे नामाधिकरण करण्याचा राज्य सरकारचा विचार होता. त्यानुसार या संस्थेचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, बारामती असे नामकरण करण्याचा करण्यात येत आहे.
शिंदे-फडणवीसांनी एका बाणात मारले दोन पक्षी
पडळकरांची ही मागणी वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी लगेचच ही मागणी मान्य केली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात दुसरी चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. शिंदे- फडणवीसांनी हा निर्णय घेऊन एका बाणात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे. याचे कारण बारामती लोकसभा मतदारसंघ हा आधीपासूनच भाजपच्या डोळ्यावर आहे. 2014 व 2019 या दोन्ही वेळेसच्या मोदी लाटेत भाजपला विजय मिळवता आला नाही. पण 2014 साली महादेव जानकर यांनी भाजपसोबत असताना बारामतीतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे फक्त 50 हजारांच्या मताधिक्याने निवडून आल्या होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघात धनगर समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे भाजपने हा निर्णय घेऊन बारामतीतील धनगर समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.
Ahmednagar name change : फडणवीसांचा होकार; अहिल्यानगरचा मुहूर्त ठरला…