अहिल्यानगरमधील बनावट ओळखपत्रांच्या प्रकाराची प्रशासनाकडून गंभीर दखल; पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू

बनावट ओळखपत्र प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती प्रभाग क्रमांक 3 चे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.

  • Written By: Published:
Untitled Design (258)

Police begin thorough investigation into fake identity card case : अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक 3 मधील आनंद विद्यालय येथील मतदान केंद्र परिसरात बनावट ओळखपत्रांचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची प्रशासनाने तातडीने आणि गंभीर दखल घेतली असून, संशयित इसमांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती प्रभाग क्रमांक 3 चे निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद विद्यालयातील मतदान केंद्रावर काही व्यक्तींकडे बनावट आधार कार्ड तसेच बनावट मतदान ओळखपत्रे असल्याच्या तक्रारी मतदान कर्मचाऱ्यांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा करताच निवडणूक प्रशासनाने तात्काळ कारवाई करत संबंधित संशयितांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

या संदर्भात बोलताना निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील म्हणाले की, “मतदान प्रक्रियेतील कोणतीही गैरप्रकार किंवा फसवणूक सहन केली जाणार नाही. प्राथमिक चौकशीत संशयास्पद कागदपत्रे आढळून आल्याने संबंधित इसमांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलिस तपासात जे तथ्य समोर येतील, त्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”

धुळ्यात मतदानाच्या दिवशीच मोठा गोंधळ; मतदान केंद्रात ठेवलेल्या ईव्हीएम मशीनच्या तोडफोडीने खळबळ

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात बनावट कागदपत्रे कुठून आणि कशा पद्धतीने मिळाली, याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या मागे कोणतेही रॅकेट किंवा संघटित प्रकार आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. आवश्यक असल्यास इतर मतदान केंद्रांवरील कागदपत्रांचीही पडताळणी करण्यात येणार आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच संशयास्पद बाबी आढळल्यास तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

follow us