Vijay Wadettiwar : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचे प्रश्न पेटलेले असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अत्यंत गंभीर आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. मराठवाड्यात गुपचूपपणे मराठ्यांना सरसकट ओबीसी प्रमाणपत्र वाटप करण्यात येत आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 28 लाख लोकांना पैसे देऊन ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. इतकेच नाही तर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मराठा असूनन ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचे निदर्शनास आणून दिले.
वडेट्टीवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराव घणाघाती टीका करत गंभीर आरोप केले. ते पुढे म्हणाले, अंबादास दानवे मराठा आहेत. पण, त्यांनी ओबीसी सर्टिफिकेट व्हॅलिडिटी देखील घेतली आहे. आतापर्यंत मराठवाड्यात 28 लाख लोकांना पैसे घेऊन जात प्रमाणपत्र, व्हॅलिडीटी देण्यात आली. हे काम वेगाने सुरू आहे. एकीकडे आपल्याला झुंजवत ठेवलं आणि दुसरीकडे सरसकट प्रमाणपत्र वाटण्याचं काम सुरू आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
BJP : सुमार कामगिरी करणारे खासदार ‘घरी’ बसणार; बावनकुळे, महाजन, मुनगंटीवारांना मिळणार दिल्लीचे तिकीट
वडेट्टीवार म्हणाले, या प्रकरणी श्वेतपत्रिका काढण्याची गरज आहे. बोगस ओबीसी प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या लाटणाऱ्यांची एसटआयटी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. त्यातून खरे काय ते बाहेर येईल. कुणी ओबीसी प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोकऱ्या मिळवून मंत्रालयात बसले असतील तर त्यांचाही शोध घेणे गरजेचे आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी कर्मचाऱ्यांचे शासकीय नोकऱ्यात प्रमाण कमी असल्याचा अहवाल काल सादर केला होता. त्यामुळे आता राज्यातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या जातनोंदी तपासणी करण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मागासवर्गीय आयोग आणि मुख्य सचिवांमार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, मराठा अशा सर्व समाजातील किती कर्मचारी सरकारी सेवेत आहेत, हे पाहिले जाणार आहे.