Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सोमवारी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भंडारा शहरात आणि पटोले यांच्या मतदारसंघात पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकारावर आता खुद्द पटोले यांनी प्रतिक्रिया देत जुनाच सूर आळवला आहे.
चर्चा तर होणारच ना! अजित पवार, जयंत पाटलांनंतर नाना पटोलेही भावी मुख्यमंत्री
पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना या बॅनरबाजीवर प्रश्न विचारला. त्यावर पटोले म्हणाले, कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक राहू शकतात. अशा पद्धतीने लोकशाहीत होत नाही. ज्याचे आमदार जास्त असतील त्यांचाच मुख्यमंत्री होतो. काँग्रेस पक्षात हायकमांड याबाबत निर्णय घेतं. कार्यकर्त्यांच्या भावना स्वाभाविक असू शकतात पण असं त्यांनी करू नये हे मी त्यांना सांगितलं आहे. आता बारामतीत बोर्ड लागलेत. पूर्ण महाराष्ट्रातच लागलेत. नागपुरात लागलेत. कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालणे कठीण असते. पण मी तुमच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो की आधी आमदार सगळे निवडून आणा नंतर काँग्रेस हायकमांड त्यावर निर्णय घेईल.
साताऱ्यात शिंदे गटाची ताकद वाढणार! राष्ट्रवादीच्या आमदारांचे बंधू शिंदे गटाच्या गळाला…
नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त काल (दि.3) भंडारा शहरासह जिल्ह्यात मोठी बॅनरबाजी करण्यात आली. यामध्ये सर्व बॅनर्सवर पटोले यांचा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. भंडाऱ्यातील साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांचा उद्या (सोमवार) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी पटोले यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत.
भंडारा शहरातील जिल्हा परिषदेच्या आवार भिंतीवर पटोलेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला बॅनर दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती मदन रामटेके, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती रमेश पारधी, पवन वंजारी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनीत देशपांडे यांनी हे बॅनर लावले आहेत. याव्यतिरिक्त पटोले यांच्या घरापासून साकोली लाखनी या त्यांच्या मतदारसंघातही बॅनर दिसत आहेत.
दरम्यान, आता निवडणुका जवळ आल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी नेतेमंडळी किती जागा मिळतील, कोणत्या जागेवर कुणाचा दावा असेल याबाबत शक्यता व्यक्त करत आहेत. त्यानंतर आता नेते मंडळींचे भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर चर्चेचा विषय ठरले आहेत.