Chhagan Bhujbal Comment on Seat Sharing : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन (Amit Shah) दिवस महाराष्ट्रात असतानाही महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटू शकला नाही. आता पुढील निर्णय राजधानी दिल्लीत होणार आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांचे नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे राज्यात याच मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शिंदे गटाला जितक्या जागा मिळतील तितक्याच जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला द्या अशी मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भुजबळांची ही मागणी व्यक्तिगत आहे, असे म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर भुजबळ यांनी उत्तर दिले आहे.
भुजबळ म्हणाले, जागावाटपाचे तुम्ही (प्रसारमाध्यमे) काढलेले फॉर्म्युले आहेत त्यावर मी काय बोलणार. तो आमचा फॉर्म्युला नाही. आम्ही एवढंच सांगितलं होतं की जितक्या जागा शिंदे गटाला दिल्या जातील तितक्याच जागा राष्ट्रवादीलाही द्या. शेवटी तिन्ही पक्षांतील वरिष्ठ नेते याबाबत काय तो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल.
माझं मत हेच आमच्या पक्षाचं मत आहे. मी काही माझं वैयक्तिक मत मांडलेलं नाही. भुजबळ बोलतो तेव्हा पार्टी बोलते. त्यामुळे मुनगंटीवारांनी त्यावर बोलण्याचं काही कारण नाही. प्रसारमाध्यमांनी काहीतरी विचारल्यानतंर ते काहीतरी सांगणार पण, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जागा घेणार नाही. दिल्लीश्वर आणि इथल्या नेत्यांशी चर्चा करून जागांचं वाटप होईल, असे उत्तर भुजबळ यांनी मुनगंटीवार यांना दिले.
काय म्हणाले होते मुनगंटीवार?
शिंदेंच्या शिवसेनेला जितक्या जागा द्याल तितक्याच जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला द्या ही भुजबळांची मागणी व्यक्तीगत आहे. त्यांच्या पक्षातील अजित पवार, प्रफुल पटेल किंवा सुनील तटकरे यापैकी जे नेते पक्षाचं संघटनात्मक काम पाहतात ते आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलतील आणि जागावाटपावर योग्य निर्णय घेतील असे मुनगंटीवार म्हणाले होते.
दरम्यान, भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. यामागे अद्याप महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी अंतिम झाली नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने भाजपकडे गतवेळी लढलेल्या सर्व 22 जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीने 10 जागांची मागणी केली आहे. या मागणीनुसार भाजपने जागा वाटप केल्यास भाजपच्या वाट्याला अवघ्या 16 जागा येतात.
जितक्या जागा शिंदेंना, तितक्याच राष्ट्रवादीलाही द्या; भुजबळांच्या वक्तव्याने जागावाटपात ट्विस्ट!
या जागावाटपाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. हा फॉर्म्यूला त्यांना मान्य नाही. परंतु, भाजपाकडून दबाव वाढल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. काही वेळानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिथून निघून गेले. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात बैठक झाली.