Lok Sabha Election : राज्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अजूनही (Lok Sabha Election) कायम आहे. हा तिढा सोडवून जागावाटपाचा मुद्दा निकाली काढण्यासाठीच काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर होते. दिवसभरात त्यांनी जाहीर सभा घेतल्या. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर बैठका घेतल्या. या बैठकीत महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्याबरोबरील 13 विद्यमान खासदारांना तरी तिकीट मिळावे ही मागणी लावून धरली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
भाजपने नुकतीच 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. यामागे अद्याप महायुतीमध्ये जागा वाटपाची बोलणी अंतिम झाली नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेने भाजपकडे गतवेळी लढलेल्या सर्व 22 जागांची मागणी केली होती. तर राष्ट्रवादीने 10 जागांची मागणी केली आहे. या मागणीनुसार भाजपने जागा वाटप केल्यास भाजपच्या वाट्याला अवघ्या 16 जागा येतात.
या जागावाटपाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने कडाडून विरोध केला आहे. हा फॉर्म्यूला त्यांना मान्य नाही. परंतु, भाजपाकडून दबाव वाढल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक झाली. काही वेळानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस तिथून निघून गेले. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात बैठक झाली.
या बैठकीत शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील सर्व 13 खासदारांना तिकीट मिळावे अशी मागणी केली. परंतु, अमित शाह यांनी त्यांनी प्रत्येक मतदासंघात काय परिस्थिती आहे याची माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या 13 पैकी आणखी काही खासदारांची तिकीटे कापली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच शिंदे गटाला 12, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा सोडण्यास भाजप तयार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जागावाटपावर आजही चर्चा सुरूच राहणार असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीची अन् शिवसेनेची मागणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने धाराशिव, परभणी, बुलढाणा, गडचिरोली, माढा, हिंगोली, बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या किमान 10 जागांची मागणी केली आहे.
तर शिवसेनेने गतवेळी लढविलेल्या मुंबईतील तीन, ठाणे, कल्याण, पालघर, मावळ, शिरुर, शिर्डी, बुलढाणा, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, रामटेक, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ-वाशिम आणि अमरावती या जागांची मागणी केली आहे.