Sanjay Raut News : उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने एक धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्याने या पद्धतीने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला बेईमानी केली. ते फक्त पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाहीत. ही फक्त आमचीच नाही तर राज्यातील साडेबारा कोटी जनतेची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्याव लागेल, अशा शब्दांत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सोडून गेलेल्यांना पुन्हा घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप सरकार, देवेंद्र फडणवीस, शिंदे गट यांच्यावर घणाघाती टीका केली. जे लोक शिवसेना सोडून गेले आहेत त्यांना पुन्हा घेणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले, जे सोडून गेले आहेत त्यांच्यासाठी आता दरवाजे बंद झाले आहेत. गद्दारांबद्दल प्रचंड रोष व्यक्त होत आहे. आमच्या संपर्कात काही जण आहेत. मेसेजही येत असतात. चेहऱ्यावर काहीही असले तरी मनातील भावना गजानन किर्तीकरांनी बोलून दाखवली. जे सोडून गेले त्यांना पुन्हा प्रवेश नाही. सर्व पक्षांनीही असेच करावे.
‘भाजप अजगर अन् मगरीसारखी जे त्यांच्याकडे गेले त्यांना खाल्ले’; राऊतांचा घणाघात
महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत राऊत म्हणाले, महाविकास आघाडीचे असे ठरले आहे की कोणताही निर्णय हा तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून घ्यायचा. कुणाची कुठे किती ताकद आहे त्याचे मोजमाप हळूहळू सुरू आहे.
फुटलेल्या गटातही फूट
राऊत पुढे म्हणाले, मला मिळालेल्या माहितीनुसार फुटलेल्या गटात अस्वस्थता आहे. नाराजी आहे. या गटातही आता दोन गट पडले आहेत. भाजपने शिवसेनेच्या प्रमुख लोकांना नेहमीच अपमानित करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली तेच आता किर्तीकरांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले.