Vinayak Raut : उद्धव ठाकरेंनी साद दिली तर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊ, असं म्हणत मंत्री शंभुराज देसाई यांनी खळबळ उडवून दिली होती. या विधानावरुन मुख्यमंत्री शिंदे यांनी देसाईंना झापलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली. असे असले तरी शिंदे गटातील नेत्यांची नाराजी आता स्पष्टपणे बाहेर येऊ लागली असून त्याला ठाकरे गटाच्या नेत्यांकडून हवा दिली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी या नाराज आमदारांबाबत मोठा दावा केला आहे. राऊत म्हणाले, राज्यात गलिच्छ आणि घाणेरडे राजकारण सुरू आहे. त्यामुळे राज्याची देशभरात बदनामी होत आहे. कुटुंब फुटल्यानंतर एकमेकांवर घाणेरडे आरोप केले जात आहेत.
अखेर ठिणगी पडलीच ! अदिती तटकरेंना रायगडचे पालकमंत्री करण्यास तीव्र विरोध
अजितदादा आणि कंपनीने उडी मारली त्याच दिवशी शिंदे गटातील आमदारांनी चळवळ करायला सुरूवात केली. त्यांचा उद्रेक थांबवताना शिंदेंची मोठीच त्रेधातिरपिट होत आहे. त्यानंतर आता मातोश्रीने साद घातली तर आम्ही नक्कीच प्रतिसाद देऊ अशी वक्तव्ये आल्याचं मी पाहिलं. त्या उपरसुद्धा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील लोक म्हणतात की जे होतं तेच बरं आहे. पुन्हा एकदा मातोश्रीची माफी मागावी असं वाटतंय अशी चर्चा सुरू आहे, असे राऊत म्हणाले.
आठ ते दहा आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला आहे, असा दावा राऊत यांनी केला. या बंडखोर आमदारांना परत घेऊ नये या विचारांचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत तरी देखील यावर अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, सध्या राज्याच्या राजकारणाची अस्थिर बनली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडून सरकारला पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार प्रचंड धास्तावले आहेत. मंत्रीपदाची स्वप्ने पाहणारे आमदार तर कमालीचे नाराज झाले आहेत. सत्तेत तिसरा वाटेकरी आला अन् तो ही अजितदादांसारखा. त्यामुळे आता या सरकारमध्ये काही खरं नाही अशी धारणा या आमदारांची होत चालली आहे. मागील दोन दिवसांपासून या आमदारांच्या वक्तव्यांतून नाराजी सातत्याने दिसून येत आहे.