Download App

एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी, तक्रारींचा पाढा की वादग्रस्त मंत्र्यांना दिलासा; पडद्यामागं काय शिजलं?

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मूड बदललेला दिसतोय. एकाच महिन्यात तीन वेळा दिल्लीचे दौरे त्यांनी केले आहेत.

Eknath Shinde Politics : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मूड बदललेला दिसतोय. एकाच महिन्यात तीन वेळा दिल्लीचे दौरे, राज्यातील मंत्र्यांची बेताल वक्तव्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वॉच अन् सर्वात महत्वाचे म्हणजे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. या सगळ्या कोंडीत एकनाथ शिंदे अडकले आहेत. राज्य सरकारमध्ये सगळेच आलबेल असल्याचे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मंत्र्यांच्या खात्यावर वॉच ठेवला जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.

त्यातच मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनीही शिंदे बॅकफूटवर गेले आहेत. या घडामोडी घडत असतानाच शिंदेंनी नुकतीच दिल्ली गाठली होती. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्याशी एकांतात चर्चाही केली. या बैठकीत काय चर्चा झाली, परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांची खरंच उचलबांगडी होणार का? मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबतीत काही चर्चा झाली की याची माहिती घेऊ या…

Video : गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बंद दाराआड खलबत; शिंदेंनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीकडून या निवडणुकांची तयारी करण्यात येत आहे. पक्षातील गळती थांबवून सत्ताधाऱ्यांना टक्कर देण्याचं आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. यात ते कितपत यशस्वी होतील याचं उत्तर आताच देता येणार नाही. त्यांच्याकडून प्रयत्न मात्र सुरू आहेत. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीत मात्र वेगळंच राजकारण सुरू आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे मंत्र्यांची वागणूक आणि वादग्रस्त वक्तव्यांनी वरिष्ठ नेते हैराण झाले आहे. अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे, शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांच्या कारनाम्यांची देशभरात चर्चा आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही गंभीर आरोप विरोधकांनी केले आहेत. तसेच आणखी एक मंत्री संजय राठोड यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत. या मंत्र्यांमुळे सरकारची जनमानसात मोठी नाचक्की झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर सरकारची इमेज डॅमेज करण्यात विरोधकांना यश मिळालं असं म्हणता येईल.

फडणवीसांनीही गाठली दिल्ली, शाहांशी खास बात

या दरम्यानच मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते. येथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत वादग्रस्त मंत्र्यांचा मुद्दा उपस्थित झाला होता. इतकेच नाही तर स्वतः अमित शाह यांनी सुद्धा मंत्र्यांच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला होता. यातच राज्य मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांची विकेट पडणार असल्याची चर्चा याच काळात रंगली होती. या आठ मंत्र्यांत शिवसेनेच्या तीन मंत्र्यांचा समावेश असल्याची बोलले जात होते. त्यामुळे या मंत्र्यांची ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उचलबांगडी होणार अशी चर्चा होती.

दिल्ली दौऱ्यात शिंदेंकडून फडणवीसांची तक्रार

या मंत्र्यांबाबत कोणताही निर्णय झालेला नसतानाच एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा करून नवा डाव टाकला. एकनाथ शिंदे सहकुटुंब दिल्लीला गेले होते. येथे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आपल्या खासदारांसह शाह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर काही वेळ एकांतातही चर्चा केली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती सूत्रांकडून बाहेर पडली आहे.

या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत महायुतीतील तक्रारींचा पाढा शाह यांच्यासमोर वाचून आपलं मन मोकळं केल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात आहे. शिंदेंच्या खात्यांवर मुख्यमंत्र्यांकडून वॉच ठेवण्यात येत आहे. महत्वाच्या नियुक्त्या देखील देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीनेच होत आहेत. त्यामुळे फडणवीसांविषयी देखील या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

VIDEO : मोदी सरकार हरलं! ट्रम्प टॅरिफपासून पाकिस्तानपर्यंत, उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून तोफ डागली

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महायुतीतील अंतर्गत वादाबाबत शिंदेंनी अमित शाह यांना साकडे घातले. यात लक्ष द्यावे, पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवावा, विकासकामांचा निधी आणि वादग्रस्त वक्तव्यांच्या संदर्भात मध्यस्थी करावी अशी विनंती शिंदेंनी केल्याची माहिती आहे. राज्यात ऐन निवडणुका जवळ आलेल्या असताना या घडामोडी घडत आहेत. या सगळ्या प्रकरणात आता दिल्लीचे वरिष्ठ नेते खरंच लक्ष घालणार का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष खरंच थांबणार, वादग्रस्त मंत्र्यांची खुर्ची वाचणार का ?  हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

 

follow us