Arvind Sawant : महाविकास आगाडीच्या वज्रमूठ सभा राज्यात सुरू आहेत. या सभांमधून महाविकास आघाडी अभेद्य असल्याचा दावा करत सत्ताधारी भाजपवर जोरदार प्रहार केले जात आहेत. या सभांना गर्दीही होत आहे. त्यामुळे भाजप सावध झाला असून या सभांवर टीकांचे सत्र सुरू झाले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या सभांवर टीका करत भेगा पडलेला वज्रमूठ असे म्हटले होते. त्यांची ही टीका ठाकरे गटाला चांगलीच झोंबली आहे. खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी फडणवीसांना कठोर शब्दांत उत्तर दिले आहे.
फडणवीस काय म्हणाले ?
काही लोक सभा घेत आहेत. वज्रमूठ दाखवत आहेत. त्यांच्या वज्रमुठीचा फोटो पाहा. त्याला भेगा पडलेल्या आहेत. भेगा पडलेली त्यांची वज्रमूठ आहे. आपल्या समोर त्यांची वज्रमूठ चालू शकत नाही. आपली मूठ सशक्त आहे. अतिशय वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष मी कधीच पाहिला नाही, असे फडणवीस म्हणाले होते.
या टीकेवर सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आमच्या वज्रमूठ सभेचा धसका त्यांनी घेतला आहे. ठोसा पडेल तेव्हा दातखिळी बसेल, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी टीका केली.
Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते?
सावंत आज अमरावतीत होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडी एकत्र येऊ नये म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगल घडविण्यात आली. नागपूरमधील सभेच्या भेगा कोणाला पडल्या या दिसतच आहेत. सभा होऊ नये म्हणून प्रयत्न केला जात आहे. वज्रमुठीचा धसका त्यांनी घेतला आहे. या वज्रमुठीचा ठोसा बसेल तेव्हा दातखिळी बसलेली असेल असा इशारा सावंत यांनी दिला.
दरम्यान, येत्या रविवारी नागपुरात सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी केली जात आहे. या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.