Download App

‘आम्हाला गृहीत धरू नका, 23 जागा आमच्याच’; सावंंतांचा भाजपला इशारा

Tanaji Sawant : राज्यात सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा सुरू आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून जागावाटपाच्या चर्चाही सुरू आहेत. अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना महाविकास आघाडी तसचे शिंदे गट आणि भाजपात खटके उडत आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे.

सावंत म्हणाले, मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 23 जागा लढविल्या होत्या. त्या पूर्ण जागा यावेळीही आम्हीच लढवू, यावर आम्ही ठाम आहोत. आमच्या शिवसेनेले कुणी गृहीत धरण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा त्यांनी दिला.

राऊतांवर टीका करतांना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत बाप काढला

सावंत यांनी सोमवारी धाराशिव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, आमची शिवसेना आणि मुख्यमंत्री स्वतः 23 जागांसाठी ठाम आहेत. मागील निवडणुकीत 23 पैकी 18 जागांवर आम्ही विजयी झालो होतो. या जिंकलेल्या जागा तर लढवणारच पण पराभव झालेल्या जागाही आम्ही सोडणार नाही. धाराशिव लोकसभेची जागा सुद्धा आम्हीच लढविणार आहोत. कुणी आम्हाला गृहीत धरण्याचे काहीच कारण नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपला इशारा दिला.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी धाराशिवमध्ये आपल्या हक्काचा खासदार हवा असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर मंत्री सावंत यांनी प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात चार-पाच दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता कठीण

दरम्यान, निवडणुका जवळ आल्याने जागावाटपाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. अद्याप काहीच निश्चित नसले तरी पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. उमेदवारांचा कलही जाणून घेण्यात येत आहे. निवडणूक आघाडीत की युती करून लढवायची हेही अजून निश्चित नाही. त्यामुळे आगामी काळात आणखी काय राजकीय घडामोडी घडतात त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.

follow us