Mahadev Jankar on MLC Election : लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघात पराभव (Elections 2024) झाला. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत भाजप संधी देईल अशी शक्यता होती. पण, महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचं राजकीय पुनर्वसन इतक्यात होईल याची शक्यता आता मावळली आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (MLC Elections 2024) 12 जुलैला मतदान होईल. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना संधी मिळेल असे सांगितले जात होते. परंतु, यंदा त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना मात्र संधी मिळाली. या घडामोडींंनंतर जानकर नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र या चर्चांत काहीच तथ्य नसल्याचं स्वतः जानकर यांनीच स्पष्ट केलं आहे.
मी मागील दोन टर्म विधानपरिषदेत काम केलं आहे. आता मोठा मार्ग पाहिला पाहिजे. मी काही नाराज नाही. आमचा पक्ष महायुतीसोबतच आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेनं जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. मी आता विधानसभा निवडणूक लढणार नाही. पक्षाचा विस्तार कसा होईल याकडे जास्त लक्ष देणार आहे, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले.
मविआच्या डावाने शिवसेना, राष्ट्रवादी अलर्ट; माघार की घोडेबाजार, शुक्रवारीच फैसला
विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात झालेल्या वादावरही जानकर यांनी प्रतिक्रिया दिली. सभागृहाचा अवमान होणार नाही याची काळजी घेऊन प्रत्येक सदस्याने वक्तव्य केले पाहिजे. राज्यात विधासभा आणि विधानपरिषद या सभागृहांचा आदर आहे. त्यामुळे येथे आम्ही जबाबदार सदस्यांनी योग्य वर्तन केले पाहिजे. योग्य चर्चा केली पाहिजे. सदस्यांनीही योग्य तेच बोललं पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीत महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. विधानसभेतील संख्याबळ पाहिलं तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येऊ शकतात. तर मविआचे मात्र दोनच उमेदवार निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीनंतरच्या घडामोडी पाहिल्या तर महायुतीत अविश्वासाचं वातावरण तयार होताना दिसत आहे. शिंदे गटाचे आमदार ठाकरे गटाच्या तर अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.
या निवडणुकीत तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीला फक्त 5 ते 6 आमदारांची गरज आहे. मग अशा परिस्थितीत काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.