अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहे. अजितदादांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अजित पवार हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मीच पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचे ठणकावून सांगितले. तसेच कुणाकडे किती आमदारांचं संख्याबळ आहे, हे तुम्हाला काही दिवसांतच दिसेल, असेही स्पष्ट केले.
आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले याची माहिती पत्रकारांना दिली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली.
ते म्हणाले, मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष. कुणी काही नियुक्त्या केल्या यात काही तथ्य नाही. आता जो कोण मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहत आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
अजित पवार आपल्याला 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र निवडणूक आयोगाला दिले आहे. तुमच्याकडे किती संख्याबळ आहे, काही आमदार तुमच्याबरोबर पुन्हा येतील का, असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, आमचा निवडणुक आयोगावर पूर्ण विश्वास आहे. जे काही सांगायचं ते तिथे सांगू. आयोग योग्य निर्णय घेईल याचा विश्वास वाटतो. तुम्हाला काही दिवसात कळेल किती आमदार आमच्याबरोबर येतील. यानंतर त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली. आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव नक्कीच होणार असल्याचे पवार म्हणाले.
राज्यकर्त्यांना किंमत चुकवावी लागेल
आताचं सरकार विरोधी पक्षांना दडपणात आणण्यासाठी ईडी व सीबीआयचा वापर करत आहे. निवडणुकीनंतर स्थिती बदलेल हे नक्की. त्यानंतर यात काय सुधारणा करता येतीले हे तेव्हा ठरवू. 2024 मध्ये राज्यात सत्ताबदल निश्चित होणार. आता विरोधी पक्षांविरोधात जे काही चाललं आहे याची किंमत आताच्या राज्यकर्त्यांना निश्चितपणे चुकवावी लागेल, असा खणखणीत इशारा शरद पवार यांनी दिला.