Maharashtra Politics शक्यता : शिंदेंचा राजीनामा, अजितदादा मुख्यमंत्री, पंकजा काँग्रेसमध्ये अन् बरंच काही…

Maharashtra Politics शक्यता : शिंदेंचा राजीनामा, अजितदादा मुख्यमंत्री, पंकजा काँग्रेसमध्ये अन् बरंच काही…

Maharashtra Politics  :  युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं, असे अनेकवेळा आपण ऐकलेले आहे. अगदी त्याचपद्धतीने आणखी एक फिलॉसॉफिकल वाक्य म्हणजे राजकारणात कोणीही कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात जनता हाच आमचा पक्ष आहे, असे म्हणत लोकांच्या विकासासाठी सत्तेत जावं लागतं, अशी वाक्य आपण अनेकदा ऐकली आहेत. गेल्या काही वर्षांपासून राजकारणात काय होईल याचा अंदाज ज्योतिषालाही येणं कठीण आहे. विश्वास न बसणाऱ्या गोष्टी घडल्यामुळे राजकारणात काहीही घडू शकतं, असे अंदाज आता खुलेआम वर्तवले जात आहे. यातील काही शक्यता या खऱ्या ठरण्याची देखील शक्यता आहे.  पण या सगळ्यात असे काही अंदाज वर्तवले जात आहेत की ज्यामुळे तुमचे मनोरंजन होऊ शकते व तुम्ही या शक्यतांवर तास अन् तास गप्पा मारत बसू शकता. अशाच काही शक्यता आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

पहिली शक्यता – पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार

माध्यमांमध्ये आज भाजप नेत्या पंकजा मुंडे या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असे वृत्त समोर आले आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे पंकजा मुंडे नाराज झाल्याचे बोलले जात आहे. धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांचे वैर लपवून राहिलेले नाही. त्यातच पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. बीआरएस पक्षाकडून त्यांना थेट मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. अशातच पंकजा मुंडेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती असल्याचे समोर आले आहे. पण या बातमीला अधिकृत दुजोरा किंवा या घटनेचा पुरावा कोणीही दिलेला नाही.

दुसरी शक्यता- ठाकरे बंधू एकत्र येणार

कालपासून आणखी एक चर्चा सुरु झाली आहे. ती म्हणजे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, अशा आशयाचे बॅनर लागले आहे. त्यानंतर दोन्ही नेते एकत्र यावे, असे त्यांचे समर्थक म्हणत आहे. काही वेळापूर्वीच मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली. यामुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला आणखी जोर चढला आहे. याआधी 2014 व 2017 साली शिवसेनेने आम्हाला ऐनवेळेस धोका दिला, असा आरोप सातत्याने मनसे नेत्यांकडून करण्यात आला आहे. यानंतर आता पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येणार का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तिसरी शक्यता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देणार

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटाची गोची झाल्याची बोलले जात आहे. अचानकपणे राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतल्याने शिंदेंच्या आमदारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित आहे. दरम्यान, नार्वेकर या आमदारांना अपात्र करणार असून त्या अगोदर शिंदे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

चौथी शक्यता- अजित पवार मुख्यमंत्री होणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच घेणार असल्याचे बोलले जात आहे. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय नार्वेकरांच्या कोर्टात आला आहे. नार्वेकर या आमदारांना अपात्र करणार असून त्या अगोदर शिंदे आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिंदेंच्या राजीनाम्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिंदेंच्या अपात्रतेनंतर अजित पवार हे मुख्यंत्री होणार असल्याचे वक्तव्य केले आहे.

पाचवी शक्यता- काँग्रेसच्या काही आमदारांचा गट फुटणार 

महाराष्ट्रात मागील दोन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आपल्यासोबत घेण्यात भाजपला यश आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर अजित पवार हे राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता राज्यामध्ये काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर काँग्रेसचे 16 ते 17 आमदारांचा गट फुटणार असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीदेखील याबाबत भाकित केले आहे. मागील वर्षी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे मतदान फुटल्याचे समोर आले होते. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी अन् आता काँग्रेसचा नंबर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube