Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शनिवारी (22 जुलै) वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यात उत्साह असून त्यांनी अनेक ठिकाणी शुभेच्छा फलक लावले आहेत. या फलकात असेही काही फलक आहेत ज्यावर अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांचं हे टायमिंग पाहून राजकीय वर्तुळात बंद पडलेल्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत यावर प्रतिक्रिया देत शिंदे गटालाही सावध केलं. अजित पवार भावी मुख्यमंत्री आहेतच आणि ते लवकरच मुख्यमंत्री होतील.
‘शुभेच्छा शतकोटी, ‘अजित’ महाराष्ट्रासाठी’ : आणखी एका आमदाराने सोडली शरद पवारांची साथ?
ते पुढे म्हणाले, अजित पवार भावी आहेत पण ते फार दिवस भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहिती आहे. काय घडामोडी घडत आहेत ते मलाही माहिती आहे. मग त्या घडामोडी कायदेशीर असतील, घटनात्मक असतील किंवा राजकीय असतील. मात्र, अजित पवार भविष्यातील मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचं हे भविष्य लवकर जवळही येत आहे. ते मुख्यमंत्री होतील यात काही शंका नाही. मी यआधीही अजित पवार मुख्यमंत्री होतील असे म्हटले होते. आता शिंदे गटानेही हे सत्य स्वीकारले पाहिजे.
रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत काल दरड कोसळल्याने गावातील 16 जणांचा मृत्यू झाला. तर ढिगाऱ्याखाली अजूनही शंभरपेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालपासूनच येथे मुक्कामी आहेत. स्थानिक प्रशासन, ट्रेकर्स ग्रुप सदस्य आणि राज्य सरकारच्या यंत्रणा एकत्रित बचाव कार्य करत आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांना आवाहन केले आहे की कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नका. पुष्पगुच्छ, होर्डींग, जाहिरातींवर पैसे खर्च न करता तो निधी इर्शाळवाडी गावाच्या पुर्नउभारणी आणि येथील संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी खर्च करा.