Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय भूकंपानंतर राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी होत आहेत. स्थानिक राजकारण असो की थेट लोकसभेच्या निवडणुका सारीच गणिते बिघडली आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एकाच खेळीने अनेक विद्यमान आमदार खासदारांचे राजकारणच संकटात सापडले आहे. आता तर खुद्द खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनाच या राजकीय नाट्याचा फटका बसणार असल्याचे दिसत आहे.
खासदार सुळेंसाठी बारामती लोकसभा मतदारसंघ आता डेंजर झोनमध्ये सापडला आहे. अजित पवार यांच्या राजकीय निर्णयानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहे. या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील आमदार जे आतापर्यंत लोकसभा निवडणुकीत सुळे यांना मताधिक्य मिळवून देत होते ते आता सुळे यांच्या विरोधात गेल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत खासदार सुळे यांना मताधिक्य मिळवून देणारे इंदापूर आणि बारामती या दोन्ही तालुक्यांचे आमदार विरोधात गेले आहेत. अशा परिस्थितीत जर याठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद आणि अजित पवार यांची साथ मिळाली तर सुळे यांची खासदारकीच धोक्यात येईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मागील निवडणुकीत दीड लाखांचे मताधिक्य
सन 2009 पासून सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत आहेत. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि आम आदमी पार्टीचे सुरेश खोपडे यांचा पराभव केला होता. तर मागील 2019 च्या निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार कांचन कुल यांचा 1 लाख 55 हजार 774 इतक्या मतांनी पराभव केला होता. त्यावेळी त्यांनी या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातून निर्णायक मताधिक्य मिळाले होते.
‘पांडुरंगाच्या दारात सांगतो, भुजबळांचा पराभव करणारच’ राऊतांचं थेट चॅलेंज!
खडकवासल्यातील शिलेदार अजितदादांच्या गटात
खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी तयारी करत असलेल्या रुपाली पाटील या आता अजित पवार यांच्या गटात सहभागी झाल्या आहेत. पण याच मतदारसंघात विकास दांगट हे सुद्धा अजितदादांबरोबर असल्याने रुपाली चाकणकर यांना तिकीट मिळणार नाही असेच दिसत आहे.
सुप्रिया सुळे यांना खडकवासला मतदारसंघात राजकीय ताकद देऊन त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा करणारे विकास दांगट आणि रुपाली चाकणकर आता त्यांच्याबरोबर नाहीत. याचा फटका सुळे यांना आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
शिवतारेंना पाडलं, पुरंदरमध्ये अजितदादाच किंगमेकर
रमेश थोरातही अजित पवार यांच्याबरोबर जातील अशी शक्यता दिसत आहे. दौंडमध्ये त्यांची ताकद आहे. याशिवाय पुरंदरमध्येही अजित पवार यांची ताकद आहे. या मतदारसंघात त्यांनी मनाशी ठरवून विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत आता अजित पवार यांनी हात काढता घेतल्यास सुप्रिया सुळे यांना आगामी लोकसभेचा पेपर अवघड जाण्याची शक्यता जास्त आहे.
भाजपसाठी परिस्थिती अनुकूल
आता मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने तशी परिस्थिती राहिली नाही. अजित पवार यांची साथ आणि भारतीय जनता पार्टीने ताकद लावल्यास निवडणुकीत कदाचित वेगळा निर्णय येऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपसाठीही हा मतदारसंघ महत्वाचा आहे. बारामती मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपाने याआधी आटोकाट प्रयत्न केले होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अभेद्य राहिल्याने यश मिळाले नाही. आता मात्र पहिल्यांदाच भाजपसाठी येथे अनुकूल वातावरण तयार झाल्याचे दिसत आहे. सध्या तरी हा मतदारसंघ सुप्रिया सुळे यांच्यासाठी आव्हानात्मक बनला आहे. अद्याप निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. आणखी काय घडामोडी पुढे घडतात यावरच पुढील राजकारण अवलंबून राहणार आहे.