Sushma Andhare : भाजप सरकारकडून तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. ईडीकडून तर सातत्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे. आवाज उठवणाऱ्यांना आत टाकायचे हाच जर त्यांचा फंडा असेल तर ईडी आणि सरकारच्या दडपशाहीविरोधात राज्यभरात जेलभरो आंदोलन करणार आहे तसेच ईडीलाही न्यायालयात काही प्रश्न विचारणार असल्याचे ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले.
अंधारे यांनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत भाजप सरकार शिंदे गट, किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, की जो आवाज उठवील त्याला आत टाकून त्याचा आवाज बंद करण्याचे काम सध्या सुरू आहे. या विरोधातच आता आम्ही राज्यभरात लवकरच जेलभरो आंदोलन करणार आहोत. पाहू या तरी त्यांचे जेल कमी पडतात की आमचे हौसले कमी पडतात. ईडीकडूनही जर अशा पद्धतीने कामकाज होत असेल तर आता आम्ही ईडीलाच न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
वाचा : सुषमा अंधारेंनी केली सोमय्यांची पोलखोल; सोमय्यांनी त्रास दिलेल्या नेत्यांची यादीच वाचली
अंधारेंनी सांगितले छापेमारीचे करेक्ट टायमिंग
देशातील नऊ विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहीले. त्यात त्यांनी भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे म्हटले होते. या पत्रानंतर तपास यंत्रणांची छापेमारी आधिक तीव्र झाली आहे. याचाच अर्थ भाजपकडून ईडी मॅन्यूप्युलेट होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
हिंदुत्वासाठी 40 भावांनी खुर्च्यांना लाथ मारावी
जे लोक तिकडे गेले आहेत त्यांचा आणि हिंदुत्वाचा सुतराम संबंध नाही. हिंदुत्वासाठी तिकडे गेलो म्हणणाऱ्यांचे खरे कारण वेगळेच होते हे आता मी दिलेल्या पुराव्यांवरून समोर आले आहे. जर उद्धव ठाकरेंचा पक्ष राष्ट्रवादी सोबत गेला तर हिंदुत्व धोक्यात येते असे म्हणणारे आमचे सगळे चाळीस चुकार भाऊ नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजपसोबत असणार आहे तर मग अशावेळी तिकडून भाजपला बाहेर पडायला सांगतील का ?, ते बाहेर पडले नाही तर भाजप नकली हिंदुत्ववादी आहे. आणि या नकली हिंदुत्ववाद्यांबरोबर तुम्हीही येथे सरकार स्थापन करणार का ?
हिंमत असेल तर भाजपने नागालँड सरकारचा पाठिंबा काढावाच, अंधारेंनी दिले हिंदुत्व सिद्ध करण्याचे चॅलेंज
मला वाटते की त्यांनी हिंदुत्वासाठी सगळ्या खुर्च्यांना लाथा मारल्या पाहिजेत, बाहेर पडले पाहिजे अन्यथा आम्ही नकली आहोत आम्हाला हिंदुत्वच काय पण मानवता धर्माचेही काहीच घेणेदेणे नाही हे कबूल केले पाहिजे.
टपरीवाल्याकडून काय अपेक्षा ?
मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली. सट्टा लावून गद्दारी केल्याचे पाटील म्हणाले. म्हणजे गद्दारी केली हे तरी ते मान्य करत आहेत. मात्र टपरीवाल्याकडून या शब्दाशिवाय आणखी कोणत्या शब्दाचा वापर होईल काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल त्यांनी केला.