सुषमा अंधारेंनी केली सोमय्यांची पोलखोल; सोमय्यांनी त्रास दिलेल्या नेत्यांची यादीच वाचली
Sushma Andhare : ठाकरे गटासह महाविकास आघडीच्या नेत्यांना हैराण करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चांगलीच पोलखोल केली आहे. अंधारे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सोमय्या यांनी कोणत्या नेत्याविरोधात किती पत्रकार परिषदा घेतल्या, किती ट्विट केले याची यादीच सादर केली. ‘सोमय्या हे उत्तम स्क्रिप्ट रायटर आहेत.
विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आधी आरोप करायचे आणि तेच नेते सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला गेले की चकार शब्दही काढायचा नाही याचा अर्थ काय ? सोमय्या ईडीचे अधिकारी आहेत का ?, त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप करणारे सोमय्या कोण ?’ असे सवाल अंधारे यांनी उपस्थित केले.
हे सुद्धा वाचा : Sushma Andhare : एकनाथ शिंदे फक्त कळसुत्री बाहुली, फडणवीस खरे सूत्रधार
‘सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्या विरुद्ध 22, भावना गवळी यांच्याविरुद्ध 8, यशवंत जाधव यांच्याविरुद्ध 16 तर अर्जुन खोतकर यांच्याविरुद्ध 9 पत्रकार परिषदा घेतल्या. भावना गवळी यांच्याविरुद्ध 122 ट्विट केले. आता भाजपला दुसरे काही काम राहिले नाही का ?, माहिती अधिकार टाकण्यासाठी त्यांनी माणूस ठेवला आहे का ?,’ असे सवाल त्यांनी केले.
‘सोमय्या हे उत्तम स्क्रिप्ट रायटर आहेत. त्यांनी आधी तयार केलेल्या स्क्रिप्टमध्ये जे व्हिलन होते त्यांना आता हिरो बनविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ते वारंवार स्क्रिप्ट बदलत असतात,’ असे अंधारे म्हणाल्या.
Sushma Andhare : BJP स्वायत्त यंत्रणेला हाताशी धरून लोकशाही धोक्यात आणू पाहते
‘सोमय्या यांनी भावना गवळी यांनाही घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनाही त्रास देण्याचे काम केले. आता मात्र गवळींनी शिवसेना सोडली आहे. त्यानंतर गवळींचे पुढे काय झाले, असा प्रश्न त्यांनी केला. सदानंद कदमांकडे डायरी सापडली अशीच डायरी यशवंत जाधव यांच्याकडे सापडली होती त्याचे काय झाले ?’ असा प्रश्न त्यांनी विचारला.
‘काल स्वच्छता दूत सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतली. ती पत्रकार परिषद म्हणजे बंबाट्या मारण्यासारखी होती. ईडीच्या प्रमुखपदी त्यांची वर्णी लागली आहे असाच त्यांचा आत्मविश्वास दिसत होता. सोमय्या हे राजकारणी कमी आणि माहिती अधिकारी जास्त आहेत. प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केला. त्यानंतर सरनाईक यांनी शरणागती पत्करत तिकडे प्रवेश केला.’
‘अनिल परब यांच्याविरुद्ध 245 ट्विट त्यांनी केले. भ्रष्टाचारी यशवंत जाधव तिकडे जाताच स्वच्छ कसे होतात ?, गवळी यांनीही बाजू बदलली की त्यांच्या सहाय्यकाची सुटका कशी होते ?, आता जर अनिल परब आणि सदानंद कदम यांनी भाजपमध्ये जायचे ठरवले तर तेही असेच स्वच्छ होणार का ?, या प्रश्नांची उत्तरे सोमय्या यांनी द्यावीत, असे आव्हान अंधारे यांनी दिले.
म्हात्रे प्रकरणी बोलणे टाळले
शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा एक मॉर्फ केलेला व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या प्रकरणी अंधारे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, की जे नेहमी अर्वाच्च, अश्लाघ्य भाषेत बोलतात त्यांच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही.