नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी विधिमंडळातील काँग्रेस पक्ष कार्यालयात महाविकास आघाडीने बैठक घेतली. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर यावेळी कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी देखील मार्गदर्शन केले.
यावेळी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचा नेते व आमदार उपस्थित होते. तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान पहिल्या दिवशी सीमा प्रश्नाबाबत विधानसभा आणि विधान परिषदेत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली होती. विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. राज्य सरकार सीमाभागातील मराठी बांधवांच्या राज्यातील विविध मुद्द्यांवर सरकारला घेरल्याने यंदाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.
यातच बेळगावात कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करत अटक केली. यामुळे याचे पडसाद अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उमटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावाद, महापुरुषांचा अपमानाच्या मुद्यावर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता.