महिलांना 5 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, खड्डेमुक्त रस्ते… मुंबईसाठी महायुतीच्या जाहीरनाम्यात काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीरनामा सादर केला.

Untitled Design (152)

Untitled Design (152)

What is in the Mahayuti manifesto for Mumbai? : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून अधिकृत वचननामा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत हा जाहीरनामा सादर केला. मुंबईचा कारभार अधिक पारदर्शक, डिजिटल आणि नागरिककेंद्री करण्यावर या वचननाम्यात विशेष भर देण्यात आला आहे. पालिकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे महत्त्वाचे आश्वासन महायुतीने दिले आहे. महापालिकेच्या कामकाजात एआय आधारित प्रणाली राबवली जाणार असून, नागरी सुविधा, निविदा प्रक्रिया, खरेदी व्यवस्था आणि प्रशासकीय कामकाज पूर्णतः डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणले जाणार आहे.

यासोबतच दरवर्षी होणारी 8 टक्के पाणीपट्टी वाढ पुढील पाच वर्षांसाठी स्थगित ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. संपूर्ण मुंबईला 24 तास पाणीपुरवठा देण्याचेही वचन देण्यात आले आहे. शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी तब्बल 17 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून दहिसर, पोईसर आणि मिठी नदीसाठी कायापालट धोरण राबवले जाणार आहे. नदीकाठ विकास प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक आणि सुरक्षित मुंबई घडवण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

महापालिकेच्या शिक्षण आणि वाहतूक व्यवस्थेवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी आवश्यक सुधारणा केल्या जाणार असून संपूर्ण शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून मुंबई खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. बेस्ट उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नवीन बसगाड्या ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत. मुंबईकरांना स्वस्त दरात आणि सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा करण्यात आला आहे. वाढत्या वाहनसंख्येचा विचार करता भुयारी तसेच जमिनीवरील पार्किंग सुविधांचा विस्तार केला जाणार आहे.

नाशिकची आईसारखी सेवा करू, सत्ता आमच्या हातात द्या; एकनाथ शिंदेंची नाशिककरांना ग्वाही

मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्यासाठी गृहनिर्माणावर भर देण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांत मुंबईत 30 ते 35 लाख घरांची निर्मिती करण्याचे लक्ष्य महायुतीने ठेवले आहे. जुनी पागडी पद्धत बंद करून भाडेकरूंना मालकी हक्काची घरे दिली जाणार आहेत. सुमारे 20 हजार इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्राचा प्रश्न मार्गी लावण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. गिरणी कामगारांना मुंबईतच घरे दिली जाणार असून धारावीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हक्काचे घर मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

झोपडपट्टीचा सुनियोजित आणि सर्वांगीण विकास करून आधुनिक सोयी-सुविधांसह लेआउट तयार केले जाणार आहेत. महिलांसाठीही वचननाम्यात विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बेस्ट बस प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.

महापालिका मतमोजणीविषयी मोठी अपडेट; एकावेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे निकाल रखडणार?

मुंबईकरांच्या आरोग्याबाबत मोठे निर्णय या वचननाम्यात नमूद करण्यात आले आहेत. 60 वर्षांवरील सर्व वरिष्ठ नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयात वर्षातून एकदा मोफत पूर्ण शरीर तपासणी दिली जाणार आहे. प्रत्येक नागरिकाचा संपूर्ण वैद्यकीय इतिहास डिजिटल स्वरूपात जतन केला जाणार असून रक्त चाचण्या, औषधे आणि प्राथमिक उपचार मोफत देणारी केंद्रे उभारली जाणार आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांचे कोणत्याही स्वरूपात खासगीकरण केले जाणार नाही, तसेच सर्व रुग्णालये पूर्णपणे महापालिकेच्याच नियंत्रणाखाली चालवली जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

रुग्णालयांतील वैद्यकीय साधनसामग्री आणि आरोग्य सुविधा अद्ययावत केल्या जाणार असून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नवीन वैद्यकीय विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. एकूणच महायुतीच्या या वचननाम्यातून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, सक्षम पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास आणि मुंबईकरांच्या जीवनमानात आमूलाग्र सुधारणा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

Exit mobile version