महापालिका मतमोजणीविषयी मोठी अपडेट; एकावेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणीमुळे निकाल रखडणार?

एका वेळी केवळ एकाच वॉर्डची मतमोजणी करण्याची पद्धत विचाराधीन आहे. त्यामुळे निवडणूक निकाल जाहीर होण्यास मोठा विलंब होण्याची शक्यता.

  • Written By: Published:
Untitled Design (239)

Will counting votes from one ward at a time delay the results? : राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत असून, त्यानंतर 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मात्र, यंदा पालिका निवडणुकीतील सर्वच वॉर्डची मतमोजणी एकाचवेळी होण्याची शक्यता धूसर बनली आहे. उपलब्ध माहितीनुसार, एकाच वेळी केवळ एकाच वॉर्डची मतमोजणी करण्याची पद्धत विचाराधीन आहे. त्यामुळे निवडणूक निकाल जाहीर होण्यास मोठा विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मतमोजणी प्रक्रियेत सर्वप्रथम टपाली मतदानाची मोजणी करण्यात येणार असून, त्यानंतर वॉर्डनिहाय मतमोजणी होईल. या प्रक्रियेमुळे दुपारपर्यंत स्पष्ट होणारे निकालाचे चित्र मध्यरात्रीपर्यंतही स्पष्ट होईल की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनातही संभ्रमाचे वातावरण असून, मतमोजणीची नेमकी पद्धत निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शक सूचना मागवण्यात आल्या आहेत.

नाशिकची आईसारखी सेवा करू, सत्ता आमच्या हातात द्या; एकनाथ शिंदेंची नाशिककरांना ग्वाही

निकाल हाती येण्यास होणार विलंब

15 जानेवारी रोजी मतदान झाल्यानंतर 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी पूर्ण केल्यानंतर वॉर्डनिहाय मतमोजणी होणार आहे. मात्र, जर एका वेळी केवळ एका वॉर्डचीच मतमोजणी करण्यात आली, तर या प्रक्रियेसाठी मोठा वेळ लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मतमोजणी केंद्रांवर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दीर्घकाळ ताटकळत बसावे लागण्याची शक्यता आहे.

एका प्रभागाची मतमोजणी पूर्ण होण्यासाठी साधारणतः एक ते दीड तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे ज्या महापालिकांमध्ये प्रभागांची संख्या अधिक आहे, तिथे निकाल मध्यरात्रीपर्यंत मिळतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, कमी प्रभाग असलेल्या महापालिकांचे निकाल संध्याकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठ्या महापालिकांचे निकाल मात्र उशिरा हाती येण्याची दाट शक्यता आहे.

Elon Musk : अश्लील फोटो वादानंतर, एक्सने मान्य केली चूक; 3500 पोस्ट अन् 600 अकाउंट डिलीट

मुंबईमधील मतमोजणीची स्थिती काय?

देशाचे लक्ष मुंबई महापालिकेच्या निकालांकडे लागले आहे. मुंबईत एकूण 227 प्रभाग असून, त्यासाठी 23 विभागीय निवडणूक कार्यालये कार्यरत आहेत. प्रत्येक निवडणूक कार्यालयांतर्गत साधारणतः 8 ते 10 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. EVM मतमोजणीपूर्वी टपाली मतदानाची मोजणी केली जाणार असून, त्यानंतर एका वेळी एकच प्रभाग या पद्धतीने मतमोजणी केल्यास 23 विभागांतील प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. परिणामी, मुंबईतील मतमोजणी मध्यरात्रीपर्यंत चालण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. याशिवाय, मतमोजणी प्रक्रिया लांबल्यास पोलीस यंत्रणा आणि मतमोजणी केंद्रांवर अतिरिक्त ताण येण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा जल्लोष, संभाव्य हुल्लडबाजी आणि मतमोजणीवरील आक्षेप व वाद लक्षात घेता ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ आणि जिकिरीची ठरण्याची शक्यता उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

follow us