Download App

जरांगे पाटलांची थेट राजकारणात जाण्याची चर्चा तर होणारच!

  • Written By: Last Updated:

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मनोज जरांगे पाटील (Manoj Jaranage Patil) यांनी त्यांच्या अटींनुसार मार्गी लावला. जालन्यापासून ते नवी मुंबईपर्यंत लाखोंची गर्दी गोळा करत सरकारवर दबाव टाकण्यात ते यशस्वी ठरले. सरकारने मराठ्यांनी काय दिले आणि प्रत्यक्षात काय मिळणार, याची चर्चा पुढे होत राहिलच. पण  पाटील यांनी सरकारला झुकविले, हा संदेश नक्कीच गेला. कोणत्याही नेत्यामागे गर्दी जमली की तो नेता आज ना द्या राजकारणात प्रवेश करतो, हेच आतापर्यंत दिसून आले आहे. त्यामुळे जरांगे पाटील भविष्यात कोणत्या पक्षात प्रवेश करणार किंवा ते मराठ्यांचा स्वतंत्र पक्ष काढणार, याची चर्चा होत असते. त्याची काय कारणे आहेत, हे आपण आता पाहूया.

खुद्द जरांगे पाटील यांनाही या आधी राजकारणात प्रवेशाबद्दल विचारले होते. त्यावर त्यांनी मी राजकारणात जाण्यापेक्षा हिमालयात निघून जाईल, असे उत्तर दिले होते. मला माझ्या समाजाचे प्रश्न महत्वाचे आहेत, असे म्हणत राजकारणात जाण्याचा मुद्दा खोडून काढला होता. पण आता आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जरांगे काय भूमिका घेणार किंव त्यांचा कल कोणाकडे असणार, याचाही अंदाज सर्वच राजकीय पक्ष घेत आहेत. कारण हिमालयात जाऊ पण राजकारण करणार नाही, असे म्हणणारे अनेक नेते महाराष्ट्रात होऊन गेले. पण नंतर त्यांनी राजकारणच केले. त्यातील दोन महत्वाची नावे. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी. दुसर महत्वाचा  मुद्दा. लाखोंनी गर्दी जमविणारा कोणताही नेता राजकारणापासून दूर राहू शकत नाही.

यामुळे जरांगे हे आता जरी राजकारणात प्रवेश न करण्याबद्दल ठाम असले तरी भविष्यात काय होईल, हे वेगळे सांगायला नको. आतापर्यंत मराठा समाजाच्या प्रश्नांसंबंधी अनेक संघटनांनी किंवा नेत्यांनी आतापर्यंत काम केले. त्यातील जवळपास सर्वच जण नंतर कोणत्या ना कोणत्या पक्षाशी निगडीत झाले. पुरूषोत्तम खेडेकर यांची संभाजी ब्रिगेड ही सुरवातीला सामाजिक संघटना होती. त्यानंतर त्यांनी संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष केला. त्याच मुद्यावर संघटनेत फूट पडली. खेडेकरांचा गट कधी स्वतंत्रपणे तर कधी इतर पक्षांशी हातमिळवणी करत राहिला. संभाजी ब्रिगेडचा दुसरा गट प्रवीण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाी काम करतो आहे. हा गट थेट राजकारणात नसला तरी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा त्यांना उघड पाठिंबा आहे. अखिल भारतीय मराठा महासंघही प्रत्येक निवडणुकीत कोणत्या ना कोणत्या पक्षासोबत गेल्याची उदाहरणे आहेत.

मराठ्यांच्या प्रश्नांवर विनायक मेटे यांनी शिवसंग्राम संघटना स्थापन केली. नंतर त्यांनी तो राजकीय पक्षही म्हणून नोंदवला गेला. मेटे यांनी कधी गोपीनाथ मुंडेंशी, कधी शरद पवार यांच्याशी जुळवून घेत आपली आमदारकी कायम ठेवली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्य पत्नी ज्योती मेटे या भाजपसोबत आहेत. मात्र तेथेही आता फूट पडली आहे. त्यांच्या दिरांनी वेगळी संघटना स्थापन करण्याचे ठरवले आहे.

या साऱ्या मराठा नेत्यांपेक्षा जरांगे यांना मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे. जरांगे यांचा चाहता वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात असला तरी बीड आणि जालना या दोन जिल्ह्यांत विशेष प्रभाव आहे.  त्यांचे आंतरवली सराटी हे गाव जालना जिल्ह्यात येते. त्यामुळे त्यांच्यासाठी जालना लोकसभेची जागा अनेकांनी निश्चितही केली आहे. ते जर जालन्यातून रिंगणात उतरले तर भाजपचे ज्येष्ठ नेते आण विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांना घाम फोडू शकतात, असेही अनेक जण छातीठोकपणे सांगतात.

जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली पाच महिने मोठ्या नेटाने लढविला. त्यांना समर्थनही झपाट्याने मिळत गेले. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही, फार शिक्षण नाही, कमावलेले वक्तृत्व नाही. तरीही जरांगे यांचा प्रामाणिकपणा समाजाला भावला. समाजच त्यांच्या पाठीशी उभा राहिला. सोशल मिडिया, टिव्ही, वर्तमानपत्रे आणि रस्त्यांवरी गर्दीतही जरांगेस नजरेस पडत होते.

या साऱ्याचा उपयोग करून जरांगे यांनी आता राजकारणात जम बसवावा, असे त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे. पण ते एखाद्या पक्षात गेले तर तेथील एखाद्या दुय्यम, तिय्यम नेत्यासारखी वागणूक त्यांना मिळू शकते. जरांगे यांचा तो स्वभाव नाही . आतापर्यंत त्यांनी जे काही मिळवले आहे ते स्वतःच्या हिमतीवर. त्यामुळे ते कोणत्या राजकीय पक्षात जाण्याची शक्यता फारच कमी वाटते. त्यांचा ओढा कोणत्या पक्षाकडे किंवा नेत्याकडे आहे, याचा थांगपत्ता त्यांनी लागून दिलेला नाही. सर्वच राजकीय पक्षांना त्यांनी आपल्या ताकदीवर वाकवले आहे. त्यांच्यावर थेट टीका करण्याची हिम्मत छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांनीच दाखवली. इतरांनी जरांगेंच्या कलाने घेणेच पसंत केले. जरांगे यांनीही प्रत्येकाची मदत घेत मराठा आरक्षणाच्या लढा नेटाने लढवला. पण जी कुजबूज मोहीम जी सुरू असते त्यात जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आतून मिलीभगत आहे, असे सांगितले जाते. शिंदे यांना मराठा स्ट्राॅंगमॅन म्हणून प्रतिमा निर्माण होण्यासाठी जरांगे यांच्या आंदोलनाचा नक्कीच उपयोग झाला. जरांगे यांच्या आंदोलनाला सर्वतोपरी मदत शिंदेंनी केल्याचे त्यामुळेच बोलले जाते. तरीही जरांगे हे शिंदेंना साथ देण्यासाठी थेट उघडपणे त्यांच्यासोबत जातील, याची शक्यत कमीच आहे. कारण जरांगेंचे स्वतःचे नेतृत्व तयार झाले आहे. ते इतरांच्या नेतृत्वाखाली काम करू शकत नाहीत.

या साऱ्या पार्श्वभूमीवर ते स्वतःची संघटना पुढे आणू शकतात आणि सोयीप्रमाणे राजकारण फिरवू शकतात. मराठवाड्यात तरी ते चमत्कार घडवून ठेवण्याची क्षमता आज कमावून बसले आहेत. अर्थात जरांगे राजकारणात गेल्यानंतर त्यांच्यावर नाराज होणाऱ्यांची संख्या कमी नसेल. जरांगेंभोवती जी गर्दी जमत आहे ती सर्वपक्षीय आहे. त्यात सर्वपक्षीय मतदार आहेत. त्यामुळे हे सारेच जरांगेंसोबत येतील, असे अजिबात नाही. त्यामुळे राजकारणात जरांगेंना झगडावे लागणार आहे. पण संघर्ष हाच तर जरांगेंचा डीएनए आहे. त्यामुळे जरांगे कुंपणावरून किती दिवस राजकारण करणार आणि ते थेट निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, याचीच उत्सुकता आहे.

 

follow us