Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात (Maratha Reservation) सर्वाधिक चर्चेत आहे. या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असतानाच काही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे सरकारच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी असेच वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणाचं वादळ अचानक कसं आलं, असा सवाल आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी विचारला होता. शासनाची दमछाक करून आताच आरक्षण द्या, कागदावर लिहून द्या अशी भूमिका घेतली जात असल्यातेही सावंत म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सावंत यांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारले. त्यावर ते म्हणाले, ते नक्की काय बोलले, हे मी ऐकलं नाही. पण त्यांना नक्की कसलं वादळ दिसलं हे मला माहित नाही. पण मराठ्यांच्या लेकरांचं वाटोळं होतंय, हे खरं आहे. त्याला कुणी वादळ समजत असतील आणि त्याविषयी असं बोलत असतील तर ही मराठा समाजासाठी मोठी शोकांतिका आहे. मराठा नेत्यांना मराठा समाजाविषयी प्रेम असलं पाहिजे. त्यांनी एकदा गोर गरीबांच्या घरात जाऊन पहावं. गोरगरीबांचं प्रेम काय असतं, त्यांच्या वेदना काय असतात हे त्यांना कळेल.
Maratha Reservation : ‘कुणबी दाखले मिळाले तरी फायदा नाहीच’ बबनराव तायवाडेंनी सांगितलं कारण..
आरक्षण कसं द्यायचं हे सरकारला चांगलंच कळतं त्यामुळे तुम्ही ज्ञान पाजळण्याची गरज नाही. टिकणारं आरक्षण द्यायचं की नाही हे सरकारला कळतं आणि आरक्षण घ्यायचं की नाही हे मराठ्यांना कळतं. मराठ्यांना वेड्यात काढून स्वतः शहाणे आहोत असे दाखविण्याची काहीच गरज नाही, असे तिखट उत्तर जरांगे पाटील यांनी मंत्री सावंत यांना दिले.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं पण आघाडी सरकारला सुप्रीम कोर्टात ते का टिकवता आलं नाही असा प्रश्नही सावंत यांनी विचारला होता. त्यावरही मनोज जरांगे पाटील यांनी सावंतांना फटकारलं. ते आता तुम्हीच विचारा. तुम्हाला फक्त बाकीच्या गप्पा मारता येतात का. श्रीमंतीची शायनिंग मराठ्यांसमोर दाखवू नका. ती तुमच्याकडेच ठेवा. तुमची मस्ती तिकडेच दाखवा. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण का टिकलं नाही याचा शोध तुम्हीच घेऊन सांगा असे आव्हान जरांगे पाटील यांनी दिले.