Meenakshi Shinde Resignation: ठाणे : ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून चर्चेत असलेल्या शिंदे गटाच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्यावर होत असलेल्या आरोपांमुळे आणि त्यातून पक्ष नेतृत्वावर दबाव निर्माण केला जात असल्याच्या भावनेतून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती, त्यानंतर मिनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिल्याने सरनाईक यांच्या भुमिकेचीही चर्चा होत आहे.
‘त्या’ शेतकऱ्याच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ नये’; आमदार गायकवाड काल बोलून गेले अन् आज युटर्न मारला…
मिनाक्षी शिंदे यांच्याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला असता, प्रताप सरनाईक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. एखाद्या व्यक्तीवर आरोप होत असतील, तर आरोप चुकीचे सिद्ध होईपर्यंत संबंधित व्यक्तीने पक्षातील पदापासून दूर राहावे, असे त्यांनी म्हटले. मिनाक्षी शिंदे या पक्षाच्या नेत्या असल्याने त्यांनीही आरोपांच्या पार्श्वभूमीवर आपले पद बाजूला ठेवणे योग्य ठरेल, अशी भूमिका आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला जवळपास एक महिना होत आला आहे. या प्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांनी मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले असून, मिनाक्षी शिंदे यांच्या अटकेची मागणीही केली आहे. या पार्श्वभूमीवर मिनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत.
आपल्या राजीनामा पत्रात मिनाक्षी शिंदे यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर आणि पक्षपातळीवर आपल्याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विविध पक्ष एकत्र येऊन आपल्यावर आरोप करत पक्ष नेतृत्वाला वेठीस धरण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या प्रकरणाशी आपला संबंध नाही, त्यात आपले नाव जोडून पक्ष आणि नेतृत्वावर दबाव निर्माण केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
ब्रेकिंग! जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील…
आपण आजवर पक्षाचे काम पूर्ण निष्ठेने केले असून, आपल्यामुळे पक्षाला किंवा नेतृत्वाला मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केलेले नाही, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. आपल्या नेतृत्वाची प्रतिष्ठा जपण्यासाठीच ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय नाराजीतून घेतलेला नसून पक्षाची प्रतिष्ठा जपण्याच्या भावनेतून घेतल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
