नंदुरबार : आम्हीच एका बाजूला का राहिलो आहे? असा पश्चाताप विरोधी पक्षात बसलेल्या आमदारांना होत आहे. त्यांच्या बोलण्यामुळे दिवाळीनंतर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी किंवा नंतर गोड बातमी मिळणार आहे असे वाटते, असे सूचक विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी केले आहे. त्यांच्या या सूचक विधानामुळे शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येणार का? असा सवाल विचारला जात आहे. (Minister Anil Patil claimed that after Diwali Sharad Pawar and Ajit Pawar group will unite)
“शरद पवार अजित पवार दिवाळीनिमित्त कुटुंब एकत्र आले आहेत. काही दिवसात गोड बातमी मिळू शकते, असं माझं वैयक्तिक मत आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षात असलेल्या आमदारांना पश्चाताप झालाय. आम्ही या बाजूला का राहिलो? असा पश्चात्ताप त्यांना होतोय. त्यांच्या बोलण्याहून मला अंदाज येतोय”, असा दावा अनिल पाटील यांनी केला.
यावेळी अनिल पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “संजय राऊत यांना राजकीय मलेरिया झालाय. त्यांना अजित पवारांच्या कुठल्याही भेटीवर असं बोलण्याची सवय आहे. ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात स्वबळावर आमदार, खासदार निवडले नाही. त्यांनी राष्ट्रवादीचा विचार करू नये. राष्ट्रवादी पक्ष अजितदादांसोबत आहे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सक्षम आहे. संजय राऊतांवर शिवसेना अवलंबून नाही आहे तर राष्ट्रवादी तर दूरच आहे. जनता आमच्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादी नंबर एकचा पक्ष म्हणून उभा राहील, असा टोलाही पाटील यांनी राऊतांना लगावला.
यावेळी पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, ठाकरे मुख्यमंत्री होऊन चुकले आहेत. ते मुख्यमंत्री म्हणून फेल झाले आहेत. राज्यांच्या मुख्यमंत्री पदाला न शोभणारा मुख्यमंत्री आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राला लाभला होता. आताचे मुख्यमंत्री उत्कृष्ट काम करत आहेत. या आधीच्या मुख्यमंत्र्यांनीही (देवेंद्र फडणवीस) आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. परंतु आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपली काय छबी पडली हे पाहावे आणि मगच भविष्याच्या विचार करावा, असा सल्लाही पाटील यांनी दिला.