Chhagan Bhujbal : राजकीय स्थान टिकवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे दोन समाजांत भांडणं लावण्याचे पाप करत आहेत, राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे याला राज्य सरकार सहमत आहे का? असा सवाल करत छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आज मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. एक लक्षात घ्या महाराज छगन भुजबळला ना मंत्रिपदाची पर्वा आहे ना आमदारकीची. तो लढेल गोरगरीबांसाठी. पण, तुम्ही महाराज आहात ना राज्याचे. सगळ्यांना न्याय द्या, अन्याय होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही एका समाजाचे नाही. तुम्ही या राज्यातील सर्व समाजाचे आहात. तुम्ही एकाच समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलता? असा सवाल भुजबळ यांनी केला.
Chhagan Bhujbal : ‘ओबीसींना बाहेर ढकलण्याचा डाव’ छगन भुजबळांचा गंभीर आरोप
इगतपुरी येथील एका सभेत भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा मनोज जरांगेंवर निशाणा साधला. तसेच संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या टिकेवर प्रत्युत्तर दिले. भुजबळ पुढे म्हणाले, आता म्हटलं जातंय की याला मंत्रीपदावरून काढा. अरे पण आयुष्यात आमदार होणं किंवा मंत्री होणं हेच सर्वस्व आहे का? छगन भुजबळच्या लेखी आमदारकी किंवा मंत्रीपदापेक्षा 374 जातीतील लोकांसाठी देशातील 54 कोटी लोकांसाठी छगन भुजबळ 35 वर्षे लढला आणि यापुढे देखील लढणार.
अन्याय आजिबात सहन करू नका
तुमच्याविरुद्ध काय बोललो आम्ही आमच्यात येऊ नका वेगळं घ्या. तुम्ही काहीही करा आणि आम्ही बोलायचं नाही. आम्ही काय मेंढरं आहोत का. तुम्हाला सुद्धा सांगून ठेवतो अन्याय सहन करायचा नाही. मग समोर कुणीही असो. अन्यायाला रोखण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करायचंय, असे भुजबळ उपस्थितांना म्हणाले.
संभाजीराजे काल म्हणाले, की भुजबळ दोन समाजात वितुष्ट निर्माण करतात. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका. राजे, संभाजीराजे आम्ही तुमचा आदर सन्मान करतो. कारण आमच्या हृदयात असलेले शाहू महाराज. जे मागासवर्गीयांना वर आणण्यासाठी त्यांची बाजू घेऊन लढत होते ते शाहू महाराज आहेत. त्या शाहू महाराजांच्या गादीवर तुम्ही आहात. तुम्ही एका समाजाचे नाही. तुम्ही या राज्यातील सर्व समाजाचे आहात. तुम्ही एकाच समाजाची बाजू घेऊन कसं काय बोलता? एकतर तुम्ही यात यायलाच नको होतं. आलात तर सांगितलं पाहिजे होतं की सगळ्यांचे अधिकार शाबूत ठेवा. कुणावरही अन्याय करू नका. ही अपेक्षा आम्हाला संभाजीराजे छत्रपतींकडून आहे.
आज दोन महिन्यांपासून राज्यात जे काही चाललंय मी कधी बोललो. त्यावेळी तर तुम्ही गप्प बसलात. तु्म्ही स्वतः बीडला जायला पाहिजे होतं. ज्यांची घरं, दुकान जाळली. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. त्यांचे अश्रू पुसायला तुम्ही जायला पाहिजे होतं. महाराज, हे तुमचंही काम नाही का, असा सवाल भुजबळ यांनी केला.