Anil Deshmukh On Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आताही अनिल देशमुखांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीसांच्या दबावामुळे विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप देशमुखांनी केला.
‘सिंघम अगेन’आधी अभिनेता रिलीज करणार ‘सिंघम’, या तारखेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत
अनिल देशमुख यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप केला. देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे पालकमंत्री आहेत. तसेच ते राज्याचे उपमुख्यमंत्रीही आहेत. मात्र, त्यांच्या दबावामुळे अनेक विकास प्रकल्पांच्या फायलींवर जिल्हाधिकारी सही करत नाहीत. आम्ही सातत्याने विविध योजनांच्या निधीसाठी मागणी करत आहोत. मात्र काटोल-नरखेड हा राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) मतदारसंघ असल्याने राजकारण करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यामुळं आमच्या विधानसभा मतदारसंघातील अनेक विकासकामे प्रलंबित असल्याचा आरोप देशमुख यांनी केला.
प्रकाश आंबेडकरांना आणि अजितदादांनी एकत्र यावे, मी मध्यस्थी करतो; मिटकरींची पुन्हा एकदा साद
पुढं बोलतांना ते म्हणाले, भाजप आमदारांना जास्त निधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना कमी निधी असं चालणार नाही. सर्वांना समान निधी मिळायला हवा. आम्हाला निधी न मिळाल्यास आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणू तसेच याविषयी न्यायालयात अपील करू. सर्वसामान्यांच्या विकासकामांसाठी आमदारांना पैसे मिळालेच पाहिजेत. यात कोणताही भेदभाव होता कामा नये, असं देशमुख म्हणाले.
यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतही भाष्य केले. दोन दिवसांपूर्वी जागावाटपाबाबत बैठक झाली. मात्र विदर्भातील अनेक जागांवर निर्णय होणे बाकी आहे. दसऱ्यानंतर आम्ही बैठक घेऊन याबाबत चर्चा करू. या जागांबाबत सक्षम उमेदवार पाहून निर्णय घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं.
त्यांना हरियाणातील काँग्रेसच्या पराभवाबाबत विचारले असता ते म्हणाले, हरियाणात इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना जागा सोडण्यात आली नाही. जर घटक पक्षांसाठी जागा सोडल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता. पण हरियाणात इंडिया आघाडीला धक्का बसला याचा अर्थ महाराष्ट्रातही तीच परिस्थिती निर्माण होईल, असे नाही, असं देशमुख म्हणाले.