Maratha Reservation : राज्यात आरक्षणावरून मराठा समाज (Maratha Reservation) आणि ओबीसींमध्ये जोरदार संघर्ष सुरू झाल्याचे दिसून येत आहे. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविला आहे. सरकार मराठा समाजाला पाठीमागील दाराने ओबीसी आरक्षण देत असल्याचे भुजबळांनी स्पष्ट सांगितले आहे. त्यावरून विरोधकांकडून टीका तर होतच आहे. शिवाय सत्ताधारी गटातील नेतेही नाराजी व्यक्त करू लागले आहेत. शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनीही भुजबळांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
आमदार बच्चू कडू यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारण्यात आले. त्यावर कडू म्हणाले, मराठा समाजाला कुणबी म्हणून 100 टक्के आरक्षण मिळेल. दोन्ही पद्धतीनं आरक्षण मिळायला सोपं जाईल. सरकार सुप्रीम कोर्टात ताकदीने बाजू मांडेल आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहेत त्यांनाही आरक्षण दिलं जाईल. जे मराठा आहेत, ते कुणबी आहेत हे शंभर टक्के सत्य आहे.
Bacchu Kadu : आता सरकारने शब्द पाळला नाही तर.. बच्चू कडूंचा सरकारला रोखठोक इशारा
मराठा कुणबी नाही तर कोण ?
भुजबळांनी आम्हाला सांगावं की मराठा कुणबी नाही तर मग कोण आहे? मराठा हा कुणबीच आहे. पण काही लोक मतांच्या पेटीचा विचार करून राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नात आहेत. ते चुकीचं आहे. आता न्यायालय याबाबतीत निर्णय घेईल. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणारच असे बच्चू कडू म्हणाले.
हा तर शुद्ध मुर्खपणा
मराठवाड्यात कुणबींच्या पाच हजार नोंदी होत्या, त्या वाढल्या कशा? असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला होता. त्यावरही कडू यांनी भाष्य केले. नोंदी आहेत. सध्या सरकार सगळ्या जुन्या नोंदी तपासण्याचे काम करत आहे. त्या नोंदी काय पाकिस्तान, अमेरिकेतून आणल्या आहेत का?, असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. मी कुणबी आहे. माझी जुनी कुणबी नोंद सापडली. मी मराठ्याचा कुणबी झालोच. पश्चिम, महाराष्ट्र, मुंबई, कोकण आणि विदर्भातील मराठे कुणबी झाले. मराठवाड्यातले पाच सहा जिल्ह्यांतील मराठे कुणबी नाहीत असं म्हणणं म्हणजे शुद्ध मुर्खपणा आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.
आता सरकारने शब्द पाळावा नाहीतर..
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. त्यावर काही दिवसांपूर्वी आमदार कडू म्हणाले होते, की सरकारने शब्द पाळला नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ताकदीने उभे राहू. 24 तारीख म्हणून सरकारला काम करावं लागेल. सरकारने 24 तास काम करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं. निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला पाहिजे. 75 वर्षांपासून मराठा समाज उपेक्षित राहिला आहे. मराठा कुणबी नाही तर कोण आहे, असा सवाल उपस्थित करत सरकारविषयी लोकांमध्ये प्रचंड रोष आहे असेही आमदार बच्चू कडू याआधी म्हणाले होते.