शरद पवारांवर आगपाखड ! आता आमदार गोपीचंद पडळकरांची घराणेशाही

Mla Gopichand Padalkar: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी ब्रम्हानंद पडळकर यांना भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत उतरविले आहे.

Gopichand Padalkar

Gopichand Padalkar

Mla Gopichand Padalkar: फुले, शाहू, आंबेडकरांच्या कुठल्या पुस्तकात लिहिलंय, शरद पवार हे चारवेळा राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पुतण्यानेच या राज्याचे अनेकवेळा उपमुख्यमंत्री व्हावं. कुठल्या पुस्तकात लिहिलंय सुप्रिया सुळेंनीच खासदार व्हावं. कुठल्या पुस्तकात लिहिलंय रोहित पवारांना मतदारसंघ नाही, तर दुसऱ्या मतदारसंघात जावून आमदार व्हावं, असा आक्रमक पवित्रा तीन वर्षांपूर्वी भाजपचे फायरब्रँड नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कट्टर समर्थक गोपीचंद पडळकरांनी (Mla Gopichand Padalkar) घेतला होता. घराणेशाहीवरून गोपीचंद पडळकरांनी अनेक वेळा शरद पवारांवर (Sharad Pawarr) नको ती टीका केली.एकेकाळी पडळकरांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांवर घराणेशाहीचा आरोप केलाय. आधी विधानपरिषद सदस्य राहिलेले, आता जत विधानसभा मतदारसंघातून (BJP) भाजपचे आमदार असलेले गोपीचंद पडळकर हेही आता धुतल्या तांदळाचे राहिलेले नाहीत. गोपीचंद पडळकरांनी आपली घराणेशाही कशी सुरू केलीय, हेच जाणून घेऊया…

गोपीचंद पडळकरांचे राजकारण आक्रमक राहिलेले आहे. शरद पवार, जयंत पाटील इतर राष्ट्रवादी, काँग्रेस नेत्यांवर बोलताना त्यांनी कुठलीच भीडभाड ठेवलेली नाही. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीसांचे जवळचे झाले. आक्रमक धनगर नेता म्हणून पडळकर यांना 2020 रोजी भाजपने विधानपरिषदेवर घेतलं. त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर ते जत विधानसभा मतदारसंघातून तब्बल 37 हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रमसिंह सावंत यांचा पराभव केला.

बंधू ब्रम्हानंद पडळकर जिल्हा परिषदेचे सभापती राहिलेले

पण गोपीचंद पडळकर हेच एकटे राजकारणात आहेत का तर नाही, त्यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हे जिल्हा परिषदेचे सदस्य राहिलेले आहेत. त्यांनी समाजकल्याण विभागाचे सभापतीपद भूषविले आहे.


आई हिराबाई पडळकरवाडीच्या सरपंच

विधानपरिषद सदस्य असताना गोपीचंद पडळकर यांनी आपल्या मातोश्री हिराबाई पडळकर यांना आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीच्या सरपंचपदी निवडून आणलं. 2022 मध्ये 70 वर्षीय हिराबाई पडळकर या जनतेतून निवडून आल्या. तेव्हा या निवडीची जोरदार चर्चा झाली.


आता वहिनीला झेडपीचे तिकीट

आईला गावचे सरपंच केल्यानंतर पडळकर यांच्या वहिनी माधवी ब्रह्मानंद पडळकर याही आता राजकारणात आल्यात. त्या भाजपच्या चिन्हावर निंबवडे गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या विद्या सचिन मोटे या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना शिंदेसेनेचे तिकिट आहे. सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. त्यासाठी पडळकरांनी आपल्या वहिनीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले असल्याची राजकीय चर्चा आहे.

जे पडळकर घराणेशाहीवरून शरद पवार, इतर काँग्रेस नेत्यांवर टीका करत करत होते, त्याच पडळकरांनी आपल्या घरात घराणेशाही सुरू केल्याचे आता दिसून येत आहे. याबाबत स्थानिक पत्रकार दत्तकुमार खंडागळे यांनी आपल्या फेसबूकवर पडळकरांच्या घराणेशाहीवर टीका केलीय. गोपीचंद पडळकरांसाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी न देता त्यांनी घरातल्याच सदस्यांना संधी दिली आहे. जवळपास वीस-पंचवीस वर्षे घराणेशाहीवर परखडपणे टिका करणारे, प्रस्थापितांच्यावर तुटून पडणारे पडळकर अखेर घराणेशाहीचेच समर्थक निघाले, असे म्हटलंय.

Exit mobile version