Mahendra Thorve : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी शिंदे गटातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आलं. विधानसभेच्या लॉबीत बोलत असताना शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये धुक्काबुक्की झाल्याचं वृत्त होतं. मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorve) यांच्यात ही धक्काबुक्की झाली. हा सगळा प्रकार समजल्यानंतर शिंदे गटाकडून सारवासारव करण्यात आली. दरम्यान, या घटनेवर आता खुद्द महेंद्र थोरवे यांनी स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्र्यांनी फोन करुन सुद्धा दादा भुसेंनी जाणीवपूर्वक काम घेतलं नाही. आमदारांची कामं होत नसतील तर काय करणार, असा सवाल थोरवे यांनी केला.
विधानसभेच्या लॉबीत झालेल्या वादानंतर माध्यमांशी बोलतांना महेंद्र थोरवे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू देत नाहीत. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून मंत्री असलेले दादा भुसे यांच्या खात्यातील एका कामाचा पाठपुरावा माझ्यासह भरत गोगवाले, खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला होता. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही दादा भुसे यांना फोन करून काम करण्यास सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांनी फोन करुन काम करण्यास सांगितलं होतं. मात्र, दादा भुसे यांनी जाणीवपूर्वक काम केलं नाही, असं थोरवे म्हणाले.
दादा भुसेंनी काम न केल्यानं आज त्यांची भेट घेतली. आतापर्यंत जे काम आमदारांची कामं आहेत, ती झाली पाहिजेत, असं त्यांना सांगितलं. त्यामुळं त्यांना वाईट वाटलं. ते उद्धटपणे आणि चिडून बोलायले लागले. आमच्यात थोडीशी बाचाबाची झाली. मात्र, झगडा म्हणावा, असं आमच्यात काहीच झालं नाही. आमच्यातील वाद मिटला, असं थोरवे म्हणाले.
मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांच्यात कोणताही वाद नाही. दोघांमध्ये काहीही झालेलं नाही. बोलतांना फक्त आवाज वाढला म्हणून वाद झाला, असं होत नहाी. दादा भुसेंशी काही कामाबाबत बोलत असताना महेंद्र थोरवे यांचा आवाज वाढल्याचे मला समजले. त्यामुळे मी महेंद्र थोरवे यांना बाजूला घेऊन संवाद साधला. महेंद्र थोरवे याचं त्यांच्या मतदारसंघातील काम होतं, अशी माहिती देसाई यांनी दिलली. धक्काबुक्की झाली याचा काही पुरावा आहे का, असा सवालही देसाईंनी केला.