Download App

गणपतरावांच्या नातवाकडून शहाजीबापूंना आस्मान! शिंदेंचा वाघ विधानसभेलाही ‘डेंजर झोनमध्ये’

“काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्केमधी हाय…” शिवसेना (Shivsena) आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी वर्षापूर्वी गुवाहटीमध्ये असताना फोनवर बोलताना हे वाक्य म्हटलं होतं. यानंतर सांगोल्यापुरते मर्यादित असलेले आमदार पाटील फक्त महाराष्ट्रात नाही तर अवघ्या देशात आणि जगातही प्रसिद्ध झाले. त्यांच्या याच वाक्यातून विरोधकांनी ’50 खोके-एकदम ओके’ ही जगप्रसिद्ध घोषणा दिली. मात्र आता 2024 च्या निवडणुकीपूर्वी आमदार शहाजीबापू पाटील डेंजर झोनमध्ये आल्याची चर्चा सुरु झाली आहे.

काही दिवसांपूर्वी सांगोला इथे झालेल्या एका कार्यक्रमात शहाजीबापूंनी आपणच आमदार असणार असा दावा ठोकला होता. पण सांगोला येथील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने बाजी मारली आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख (Babasaheb Deshmukh) यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या निवडणुकीत शेकापचे सर्वच्या सर्व 21 उमेदवार निवडून आले आहेत. शहाजीबापूंच्या पॅनेलला व्हाईटवॉश देत शेकापने (Peasants and Workers Party of India) निर्विवाद वर्चस्व निर्माण केले आहे. यानंतर डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोल्यात पुन्हा एकदा लाल बावटा फडकवणारच असा निर्धारही व्यक्त केला आहे.

शहाजीबापू अवघ्या 600 मतांनी आमदार :

सांगोला आणि शेकाप हे समीकरण मागच्या अनेक निवडणुका तयार झाले होते. या मतदार संघावर शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांचे 50 वर्षे एक हाती वर्चस्व होते. 1995 सालचा अपवाद वगळता 1972 पासून त्यांनी सलग 11 वेळा निवडून येण्याचा त्यांनी विक्रम नोंदवला होता. यंदा वयोमानामुळे देशमुख यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेकापने भाऊसाहेब रूपनवरांना उमेदवारी जाहीर केली होती.
मात्र ऐनवेळी रूपनवरांऐवजी गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांना उमेदवारी देण्यात आली.

यानंतर नाराज रूपनवरांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाय राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनीही सेनेचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांना पाठिंबा दिला. अखेर अटीतटीच्या लढतीत सेनेच्या शहाजी बापू पाटील यांनी अवघ्या 600 मतांनी शेकापच्या गडावर भगवा फडकवला. पण आता शेकापने पुन्हा एकदा हा बालेकिल्ला ताब्यात घेण्याचा निर्धार केला आहे. याची सुरुवात सुतगिरणीच्या निकालाने झाले असल्याचे बोलले जात आहे. नुकत्याच आलेल्या काही सर्व्हेंमधूनही इथे शहाजीबापू पाटील यांना विधानसभेची वाट अवघड असल्याचे सांगितले होते.

निवडणूक लढविण्याची दीपक साळुंखेंची घोषणा :

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांनी मी सांगोल्यातून विधानसभा लढवणारच, पुढं कोणी असू द्या, मागं हटणार नाही, अशी घोषणा केली आहे. 2019 च्या निवडणुकीत दीपक साळुंखे यांनी शहाजीबापू पाटील यांना मदत केली होती. त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला होता. आता एका बाजूने शेकापचे वादळ आणि दुसऱ्या बाजूला दीपक साळुंखेंचा निर्धार यामुळे शहाजीबापू पाटील यांना आणखी मेहनत करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

follow us