सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन लोकसभा मतदारसंघांबाबत सध्या महाविकास आघाडीत टोकाची खडाखडी सुरु आहे. कोल्हापूर मतदारसंघ आपल्याला सोडावा अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे. तर त्या बदल्यात काँग्रेसने शिवसेनेला सांगली लोकसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखवली असल्याची माहिती आहे. मात्र वरच्या पातळीवर सुरु असलेल्या या चर्चांची कुणकुण स्थानिक पातळीवर लागताच सांगली मतदारसंघातील काँग्रेसचे नेते सक्रिय झाले आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी आमदार विश्वजीत कदम आग्रही असून त्यांनी त्यासाठी प्लॅनही आखला आहे. अगदी दिल्लीपर्यंत धडक मारण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. (MLA Vishwajit Kadam insists on keeping Sangli Lok Sabha constituency with Congress)
विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी एकनाथ शिंदेसोबत जाणे पसंत केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांची संख्या, काँग्रेसची महापालिका, जिल्हा परिषद यावरील सत्ता आणि सतेज पाटील यांच्यासारखे नेतृत्व या बळावर काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. तसेच शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे काँग्रेस कोल्हापूरसाठी आग्रही असल्याचे दिसून आले होते. या वादात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनीही हस्तक्षेप करत कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी ठाकरे यांना तयार केले.
अखेरीस कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यासाठी ठाकरे तयारही झाले असल्याची माहिती आहे. मात्र त्याबदल्यात त्यांनी सांगलीची मागणी केल्याचे समजते आहे. यावर दोन्ही पक्षांच्या बैठकीत एकमतही झाले आहे. वरच्या पातळीवर सुरु असलेल्या या चर्चांची सांगलीत स्थानिक पातळीवर कुणकुण लागताच काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. सांगली हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. अगदी आणीबाणीनंतरच्या काँग्रेसविरोधी लाटेतही या मतदारसंघांने काँग्रेसचीच साथ दिली आहे, असा दावा करत सांगली ठाकरे गटाला सोडण्यासाठी आमदार विश्वजीत कदम यांनी तीव्र विरोध केला आहे.
यंदा विशाल पाटील यांची उमेदवारी जवळपास नक्की मानली जात होती. त्यांनीही मागील अनेक दिवसांपासून तयारी करायला सुरुवात केली आहे. गतवेळीही विशाल पाटील यांनी काँग्रेसकडून लोकसभेसाठी तयारी केली होती. मात्र अखेरच्या क्षणी हा मतदारसंघ जागा वाटपात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुटला. त्यामुळे नाईलाजाने पाटील यांनी स्वाभिमानीचे तिकीट घेतले होते. आता यावेळी मात्र बालेकिल्ला दुसऱ्या पक्षाला सोडायला पाटील यांचा विरोध आहे. त्यामुळेच आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील काँग्रेस नेते एकवटले आहेत.
राज्यातील 19 लोकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची महत्वाची बैठक बुधवारी मुंबईतील टिळक भवनमध्ये होत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते मुंबईला रवाना झाले आहेत. सांगली मतदार संघ काँग्रेसकडेच राहावा, यासाठीचा प्लॅन या बैठकीआधी आमदार विश्वजीत कदमांच्या बंगल्यावर ठरणार आहे. आमदार विश्वजित कदम सध्या मुंबईतच आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार, जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहर-जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील आणि प्रा.सिकंदर जमादार हे मुंबईतील बैठकीत सांगली मतदार संघाच्या तयारीचा अहवाल सादर करतील. मुंबईतील या बैठकीत विषय संपला नाही, तर दिल्लीवारी करण्याचा निश्चय या नेत्यांनी केला आहे. दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, काँग्रसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांच्यासमोर आपली मागणी मांडण्याचे या नेत्यांचे नियोजन आहे.
सांगली मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला सुटला तर शिवसेना इथे पहिल्यांदाच निवडणूक लढविताना दिसणार आहे. आतापर्यंत भाजप – शिवसेनेच्या युतीत सांगली भाजपच्या वाट्याला होता. यातील 2014 आणि 2019 मध्ये भाजपने इथून विजयही मिळविला आहे. सध्या जिल्ह्यात ठाकरेंचा एकही आमदार नाही. किंबहुना आमदार अनिल बाबर यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर शिवसेनेचा एकही आमदार नाही. त्यामुळे ठाकरे यांना आधी संघटनात्मक बांधणी करावी लागणार आहे. त्यानंतर सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे.
महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब पटकावणारे चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. बैलगाडी शर्यती, रक्तदान शिबिरे यामाध्यमातून ते जनसंपर्क वाढवत आहेत. गावोगावच्या कुस्ती मैदानांना भेटी देत पैलवानांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत. सांगलीची जागा ठाकरे गटाला जाणार असल्याची कुणकुण लागताच पैलवान पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याचीही माहिती आहे.
या सगळ्यामुळे आता सांगली काँग्रेसकडेच राहणार की ठाकरेंकडे जाणार? ठाकरेंकडे गेल्यास चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश करुन ठाकरे गट त्यांना उमेदवारी देणार का की विशाल पाटील हेच मशालीच्या चिन्हावर लढणार हे बघावे लागणार आहे.