Download App

लाभार्थी महिला अपात्र ठरणार! राज ठाकरेंचा महायुतीवर निशाणा, ‘निवडणुकीच्या आधी लाडक्या असणाऱ्या बहिणी आता…’

निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.

  • Written By: Last Updated:

Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) बळावर महायुतीने (Mahayuti) विधानसभेत घवघवीत यश मिळवल. याचे श्रेय सत्ताधाऱ्यांनी राज्यातील महिलांना दिलं. परंतु, आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कोणत्याही लाभार्थी महिलेसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तिच्या अर्जाच्या छाननी केली जाईल आणि निकषबाह्य अर्ज अपात्र ठरवतील, असं मंत्री आदिती तटकरेंनी स्पष्ट केलं. यावर आता राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भाष्य केलं.

अजित पवारांना अडकवण्याचा कराडचा प्लान होता का?, बजरंग सोनावणेंचा खळबळजनक दावा 

निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार, असा टोला राज ठाकरेंनी लगावला. इतर अनेक स्मारकं जशी लालफितीत अडकतात सावित्रीबाईंचे स्मारक लालफितीत अडकू नये, असंही ते म्हणाले.

राज ठाकरेंनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ज्यांच्यामुळे रोवली गेली आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सत्यशोधनाच्या खडतर प्रवासात ज्यांनी मोलाची साथ दिली, त्या सावित्रीबाई फुलेंची आज जयंती. स्त्री स्वातंत्र्य औषधाला देखील सापडणार नाही अशा काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. तो काळ असा होता की स्त्री शिकली तर तिच्या सात पिढ्या नरकात जातील असं मानण्याचा काळ. पण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे दोघेही ज्ञानासाठी आसुसलेले होते, आणि त्यामुळेच ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईनी शिक्षणाचा मार्ग स्वीकारला आणि इतकंच नाही तर मुलींसाठी शाळा सुरु केली. त्यावेळच्या अखंड हिंदुस्थानातील, स्वदेशीय व्यक्तीने काढलेली पहिलीच मुलींची शाळा. पण सावित्रीबाईंना प्रचंड अहवेलना, आणि उपहास सहन करावा लागला. आज थेट अंतराळात झेप घेणारी स्त्री असो की एखाद्या उद्योगसमूहाची प्रमुखपदी बसलेली स्त्री असो, तिचा हा प्रवास सावित्रीबाईंमुळेच शक्य झाला हे नक्की. सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन, असं ते म्हणाले.

स्मारक लवकरात लवकर व्हावं
पुढं त्यांनी लिहिलं की, २ वर्षांपूर्वी तत्कालीन राज्य सरकारने पुण्यात ज्या भिडे वाड्यात सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्या वाड्याचं रूपांतर राष्ट्रीय स्मारकात करण्याची घोषणा केली होती. या घोषणेचं तेंव्हा आम्ही स्वागत केलं होतं आणि हे स्मारक लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

मध्यंतरी या स्मारकाचं कामकाज कुठवर आलं आहे हे जाणून घेतलं, तेंव्हा कळलं की मध्यंतरी हे काम अनेक कायदेशीर गुंतागुंतीत अडकलं होतं, त्यातले काही विषय न्यायप्रविष्ट होते, जे आता सुटलेत. मुळात इतक्या मोठ्या महापुरुषांच्या स्मारकांसाठी देखील आपल्याला कायदेशीर लढाया लढाव्या लागतात हेच दुर्दैव. असो. पण आता हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं हीच अपेक्षा. आणि स्मारक म्हणजे एखादा पुतळा किंवा एखादं संग्रहालय इतकं मर्यादित न ठेवता, त्याला आधुनिकतेची जोड द्यावी. यासाठी सरकारी साचा सोडला पाहिजे, असंही राज ठाकरे म्हणाले.

सावित्रीबाईंचे स्मारक लालफितीत अडकू नये
सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याचा आढावा घेणारा एखादा बहुभाषिक साउंड आणि लाईट शो, एखादी डिजिटल लायब्ररी असं काहीतरी असावं. आणि हे सगळं एका कालमर्यादेत पूर्ण करावं. अन्यथा इतर अनेक स्मारकं जशी लालफितीत अडकतात तसं हे स्मारक अडकू नये इतकीच इच्छा, असंही राज ठाकरे म्हणाले.

सरकारनेच कालच लाडक्या बहीण नक्की कोणाला म्हणावं याचा फेरआढावा घ्यायला सुरुवात केला आहे, थोडक्यात निवडणुकीच्या आधी सरसकट लाडक्या असणाऱ्या बहिणी आता नावडती आणि लाडकी अशा पद्धतीने विभागल्या जाणार असं दिसतंय. असो, असं धरसोडपण स्मारकाच्या बाबतीत दिसू नये, असं म्हणत राज ठाकरेंनी सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस अभिवादन केलं.

follow us