MP Shrikant Shinde Press Conference : ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या गटाकडून शिवसेना-भाजप सरकारवर करण्यात येणारे आरोप म्हणजे निव्वळ सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. ठाकरेंच्या गटात जे उरलेले आमदार आहेत त्यांना हा थांबवण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. तसेच ठाकरे गटसह अनेक पक्षातले नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत पण नावे आता सांगणार नाही. कारण मग सरप्राईज काय राहणार? असे देखील शिंदे म्हणाले आहे.
तसेच खासदार शिंदे सुप्रीम कोर्टाच्या निकालावर बोलताना म्हणाले, ठाकरे गट आता स्वतःला सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा समजू लागला आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेना भाजप सरकार अधिकृत असल्याचे आणि विधानसभा अध्यक्ष योग्य प्रक्रियेने निवडला असल्याचे स्पष्ट केले असतानाही ठाकरे गट, सरकार बेकादेशीर असल्याचे सांगत, जनतेची दिशाभूल करीत आहे. 16 आमदारांबाबत 15 दिवसात निकाल द्या, राज्यपालांवर कारवाई करावी अशा मागण्या करणे म्हणजे ठाकरे गट स्वतःला सुप्रीम कोर्टापेक्षा मोठा समजू लागला आहे, असे शिंदे म्हणाले.
सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाच्या 8 पैकी सहा मागण्या साफ फेटाळल्या आहेत. मात्र जणू काही पूर्ण निकाल आपल्या बाजूने लागल्यासारखे भासवून आणि खोटी व चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचे काम ठाकरे गटाकडून सुरु आहे, असे शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागितला, याबाबत बोलताना श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे यांना उत्तर देताना सांगितले की, ठाकरे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत. ठाकरे यांच्याकडे बहुमत नव्हते तसेच आत्मविश्वासही नव्हता म्हणून त्यांनी राजीनामा दिला. नैतिकता म्हणून राजीनामा दिला तर मग कोर्टात परत आपल्याला मुख्यमंत्री करा अशी मागणी का केली? कुठे गेली तुमची नैतिकता?
‘The Kerala Story’ लवकरच पार करणार १०० कोटींचा आकडा; आठवड्यातच जमवला ‘इतका’ गल्ला
नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत निवडणुकीला सामोरे जा अशा वल्गना ठाकरे गट करत आहे. मात्र अगोदर शिवसेना-भाजप म्हणून निवडणूक लढवून मते मिळवलेल्या तुमच्या 13-14 आमदारांना राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जायला सांगा आणि बघा आता किती मते मिळताहेत, जनतेचा किती पाठिंबा आहे? म्हणजे तुम्हाला कळेल,” असा सल्ला शिंदे यांनी ठाकरेंना दिला. नैतिकता तुम्ही सोडली आम्ही नाही, असेही शिंदे म्हणाले. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत याच्या आरोपांवर काही न बोलता महाराष्ट्राच्या जनतेची सकाळ खराब करणाऱ्यांवर मी काही बोलणार नाही असे सांगितले.