Nana Patole : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याचे सत्तेतील मंत्र्याशी संबंध असल्याचे दावे केले जात आहे. अशातच दोन दिवसापूर्वी एल्विश यादव (Elvish Yadav) विरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापाचे पुरवल्याचा आरोप आहे. एल्विसवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका झाली. सीएम शिंदे आणि एल्विश यांचे फोटो समोर आले होते. दरम्यान, आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारवर टीका केली.
“शरद पवारांनी ‘त्यावेळी’ रातोरात मराठ्यांचं आरक्षण घालवलं” : नामदेव जाधव यांचा थेट आरोप
आज माध्यमांशी बोलतांना पटोले म्हणाले की, गुजरातचे ड्रग्ज महाराष्ट्रात आणण्याचं काम शिंदे सरकारने केलं. राज्य सरकार राज्याला ड्रग्सच्या विळख्यात ढकलण्याचे काम करत आहे. ललित पाटीलच्या माध्यमातून हे उघडकीस आलं. मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ महाराष्ट्रात येत असून त्यावर राज्य सरकारचे नियंत्रण नसल्याचा आरोप पटोले यांनी केला.
ते म्हणाले, महाराष्ट्रात ड्रग्ज गुजरातमधून येत असताना सरकारचे त्यावर नियंत्रण नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ड्रग्जची पाळंमुळं नष्ट करू असं जाहीर केलं असलं तरी गुजरातवरून ड्रग्जचा पुरवठा कसा होतो, याची चौकशी केली पाहिजे, असं पटोले म्हणाले.
मराठवाड्यात कुणबी मोठ्या संख्येने असूनही त्यांना लाभ मिळत नाही. शिंदे समितीला अशा नोंदी सापडल्या आहेत ज्यामध्ये मराठा शब्द आढळतो, जनगणना महत्त्वाची गोष्ट आहे. केंद्र सरकारने जनगणना थांबवली असून, ५० टक्के मर्यादा हटवल्याशिवाय आरक्षण देण्यात अडचण येईल, असंही पटोले म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आईंनी आज मतदान करतांना अजित पवार मी हयात असतांना मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा बोलून दाखवली. त्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार यांच्या आईची इच्छा आहे की, आपल्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे. त्यात काही गैर नाही. मात्र महायुतीत अजित पवार यांना संधी मिळेल असे वाटत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, पटोलेंना आता अजित पवार गट काय प्रतिक्रिया देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.