NCP Crisis : राष्ट्रवादीतील तिढा आता (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. आता हा वाद निवडणूक आयोगासमोर असून सुनावणी सुरू आहे. आता आज निवडणूक आयोगात महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटावर शरद पवार (Sharad Pawar) गटाने गंभीर आरोप केले होते. राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांची खोटी कागदपत्रे सादर केल्याचा हा आरोप होता. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आज सुनावणी होणार आहे.
आजच्या सुनावणीत कदाचित पक्षातील संख्याबळाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. काल अजित पवार गटाने मोठी खेळी करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या तिघांना सोडून बाकी सर्व खासदारांना अपात्र करावे, अशी मागणी लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींकडे केली होती. त्यामुळे आजच्या सुनावणीत हा मुद्दा येणार का हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. शरद पवार गटाकडून यांच्या गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनू सिंघवी युक्तिवाद करणार आहेत.
Ajit Pawar : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? अजित पवारांनी दिलं ‘सेफ’ उत्तर, म्हणाले..
अजित पवार गटाने खोटी कागदपत्रे सादर केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शरद पवार गटाने केली होती. यावर आज शरद पवार गटाकडून सविस्तर भूमिका मांडण्यात येणार आहे. त्यानंतर अजित पवार गटाकडूनही युक्तिवाद होईल. या दोन्ही गटांकडून काय युक्तिवाद केला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी जुलै महिन्यात राष्ट्रवादीतील मोठा गट सोबत घेत बंडखोरी केली. त्यानंतर ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासह काही आमदारांना मंत्रिपदेही मिळाली. आता अजित पवार गटाबरोबर नेमके किती आमदार आहेत याचा अजून खुलासा झालेला नाही. तरी देखील या गटाने थेट पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगात धाव घेतली होती. याच प्रकरणात आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. सुनावणी होऊन आयोग या प्रकरणात निर्णय देईल अशी शक्यता आहे. तसेच ही सुनावणी कदाचित पुढे लांबण्याचीही शक्यता नाकारता येत नाही असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
NCP News : राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह कुणाचं? शरद पवार की अजितदादांचं? आज महत्वाची सुनावणी