दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणावर कोणीही बालू नये; केवळ तीन नेत्यांवरच जबाबदारी, शरद पवारांच्या पक्षाकडून स्पष्ट आदेश

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाबाबत पक्षाचे प्रवक्ते व इतर नेत्यांनी भूमिका मांडू नये, माध्यमांशी बोलू नये.

Ncp Sunetra Pawar And Sharad Pawar

Ncp Sunetra Pawar And Sharad Pawar

NCP Merger: राज्यातील बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनिकरण (NCP) होण्याबाबत एकमत झालं होतं. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीला अजित पवार (Ajit Pawar) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काही नेते उपस्थित होते. येत्या 12 फेब्रुवारीला विलिनिकरणाबाबत घोषणा होणार होती, असा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जात होता. पण दुसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा दावाच फेटाळून लावला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाला आता ब्रेक लागताना दिसत आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. ( NCP Merger and Only Supriya Sule, Jayant Patil And Shashikant Shinde To Speak)

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनिकरणाबाबत पक्षाचे प्रवक्ते व इतर नेत्यांनी भूमिका मांडू नये, माध्यमांशी बोलू नये, अशा सूचना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून देण्यात आल्या आहेत. विलिनिकरणावर बोलण्याबाबत तीन नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ आमदार जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे या तीन नेत्यांना विलिनिकरणाबाबत बोलण्यास पक्षाने परवानगी दिली आहे. इतर नेत्यांनी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय यावर विषयावर बोलू नये, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने दिल्या आहेत. माहितीअभावी चुकीची माहिती जावून चर्चा भरकटू नये म्हणून अशा सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसने दावे फेटाळले

अजित पवार यांचीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी इच्छा होती, ती आम्ही पूर्ण करू, असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. पण हे दावे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे इतर नेत्यांनी फेटाळून लावले आहेत. तर मंत्री छगन भुजबळांनी मला असे काही माहिती नाही, असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलिनिकरणासाठी राजी नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


जयंत पाटलांच्या घरी बैठक झालाचा दावा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गेल्या आठवड्यात बारामतीत विमान कोसळून अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूपूर्वीच दहा दिवस आधी शरद पवार व अजित पवार यांची बैठक झाली होती. या बैठक विलिनिकरणासाठी झाल्याचा दावा केला जात आहे. ही बैठक जयंत पाटील यांच्या घरी झाल्याचे आता पुढे येत आहे.

Exit mobile version