सुनेत्रा पवारांवरील टीकेवरून संजय काकडेंचं शरद पवारांसह राहुल गांधींना पत्र; हर्षवर्धन सपकाळांबाबत केली मोठी मागणी
उपमुख्यमंत्र्यांविषयी करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे मन व्यथित झाल्याने आपण ही भूमिका घेत असल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या ‘गुंगी गुडिया’ या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते तथा माजी खासदार संजय काकडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना स्वतंत्र पत्रे पाठवत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. सपकाळ यांनी तत्काळ आपले शब्द मागे घेऊन सार्वजनिक माफी मागावी, तसंच त्यांच्यावर पक्षाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी काकडे यांनी केली आहे.
शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात काकडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत परंपरेचा उल्लेख करत महिलांचा सन्मान ही राज्याच्या राजकीय संस्कृतीची ओळख असल्याचे नमूद केले आहे. स्वतः शरद पवार यांनी नेहमीच महिलांचा आदर राखण्याची परंपरा जोपासली असून, सुनेत्रा पवार या केवळ राज्याच्या उपमुख्यमंत्री नसून पवार कुटुंबाच्या सूनदेखील आहेत. त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठ म्हणून आपण या प्रकरणात हस्तक्षेप करून सपकाळ यांच्या विधानाचा निषेध करावा आणि त्यांना माफी मागण्यास सांगावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
Video : आम्ही गुंगी गुडिया म्हटलो, तुम्ही दुर्गा व्हा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ काय म्हणाले?
हे पत्र कोणत्याही राजकीय हेतूने लिहिले नसून राज्याच्या महिला उपमुख्यमंत्र्यांविषयी करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे मन व्यथित झाल्याने आपण ही भूमिका घेत असल्याचेही काकडे यांनी स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस हा घटक पक्ष असून शरद पवार हे आघाडीतील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी याबाबत ठाम भूमिका घेतल्यास समाजात योग्य संदेश जाईल आणि भविष्यात कोणत्याही महिला नेत्याविषयी अशा प्रकारची भाषा वापरण्यापासून राजकीय नेत्यांवर नैतिक दबाव निर्माण होईल, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनाही पाठवलेल्या पत्रात काकडे यांनी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मान्य असला तरी महिलांचा अवमान करणारी भाषा वापरणे आणि त्यासाठी काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर होणे हे पक्षाच्या भूमिकेला शोभणारे नसल्याचे नमूद केले आहे. एकीकडे राहुल गांधी देशभर प्रेम, सौहार्द आणि संवादाचा संदेश देत असताना दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष एका महिला उपमुख्यमंत्र्यांविषयी अशा प्रकारची टिप्पणी करतात, ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी कठीण मानसिक परिस्थितीतही उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून काम सुरू ठेवले आहे. त्यांच्या वैयक्तिक दुःखाचा विचार न करता करण्यात आलेले हे वक्तव्य अधिक वेदनादायी असल्याचे काकडे यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अधिकृत संकेतस्थळावरील संबंधित उल्लेख तात्काळ हटवावेत. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही आपल्या वक्तव्याबाबत शब्द मागे घ्यावेत, अशी अपेक्षाही त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे व्यक्त केली आहे.